Coronavirus: महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणार 'पीपीई' किट 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या देशातील रुग्णालयांपर्यंत 'पीपीई' किट पोचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. सध्या तीन लाख 87 हजार 443 'पीपीई' किट उपलब्ध आहेत.

पुणे -  मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयातील तीन डॉक्‍टर आणि 26 परिचारिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या दिवशीच वैद्यकीय तज्ज्ञांसाठी अत्यावश्‍यक 'पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट' (पीपीई) किट भारतात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूंच्या विरोधातील युद्ध हे डॉक्‍टर आणि परिचारीका यांच्या मदतीने लढले जात आहे. कोरोनाच्या प्रत्येक रुग्णावर उपचारासाठी डॉक्‍टरांची सुरक्षितता अत्यावश्‍यक असते. त्यासाठी डॉक्‍टर, परिचारिकांसह तेथील कर्मचाऱ्यांना 'पीपीई' किट महत्त्वाचे ठरते. 'सकाळ'ने याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता केंद्र सरकारने 'पीपीई' किट कोरोनाचा उद्रेक झालेल्या राज्यांना पुरविण्यात येणार असल्याची घोषणा केली. 

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव

देशात 'पीपीई' किटचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांवरील उपचाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केंद्राने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून किट आयात करण्याबरोबरच देशांतर्गत कंपन्यांमधूनही किटचे उत्पादन सुरू केले. त्याच्या पहिल्या टप्प्यात चीनमधून एक लाख 70 हजार 'पीपीई' किट आयात केले आहेत. तसेच, वीस हजार किट देशांतर्गत कंपन्यांकडून उत्पादित करण्यात आले आहेत. त्यामुळे हे एक लाख 90 हजार किट कोरोनाचा उद्रेक झालेल्या महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि राजस्थान या राज्यांना प्राधान्याने पुरवण्यात येणार असल्याचे केंद्राने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. 

रुग्णालयापर्यंत किट पोचवणार 
कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या देशातील रुग्णालयांपर्यंत 'पीपीई' किट पोचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. सध्या तीन लाख 87 हजार 443 'पीपीई' किट उपलब्ध आहेत. त्यापैकी दोन लाख 94 हजार किटचे पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे. 

दोन लाख "एन-95' मास्कचे उत्पादन 
'एन-95' प्रकारच्या दोन लाख मास्कचे उत्पादन देशातील विविध कंपन्यांनी केले आहे. सध्या देशात 16 लाख 'एन-95' मास्क उपलब्ध आहेत. त्यात लवकरच दोन लाख मास्कची भर पडणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra will get PPE kit from Center goverment