वृत्तपत्रातून संसर्ग होत नाही - डॉ. तात्याराव लहाने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही संसर्ग पसरत असल्याचा संशय व्यक्त होत असताना, हा केवळ गैरसमज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अफवांवर ‍विश्‍वास ठेवू नये, असेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये अनेक प्रकारच्या अफवा पसरत असून त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. वृत्तपत्रांच्या माध्यमातूनही संसर्ग पसरत असल्याचा संशय व्यक्त होत असताना, हा केवळ गैरसमज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अफवांवर ‍विश्‍वास ठेवू नये, असेही आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसर्ग होत असल्याच्या भीतीमुळे अनेक मोठ्या सोसायट्यांनी वृत्तपत्रे बंद केली आहेत. काही शहरांमध्ये वृत्तपत्र विक्रेता संघांनीही वितरण बंद केल्याने या गैरसमजाला बळ मिळाले आहे. मात्र, वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) उपसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. लहाने म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत नाही. कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती शिंकल्यास किंवा खोकल्यास त्याच्या थुंकीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्‍यता असते. वृत्तपत्र ही निर्जीव वस्तू असल्याने त्यावर पडलेले कोरोनाचे विषाणू काही वेळातच मृत होतात. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ शकत नाही. कोरोनाबाधित देशांतून आलेल्या रुग्णांकडून हा संसर्ग होण्याची शक्‍यता असते. बाधित नसलेल्या लोकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. वस्तूंवर हा विषाणू फार काळ जिवंत राहत नाही. त्यामुळे वृत्तपत्रांच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार आणि संसर्ग होणे शक्‍य नाही, असे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले. 

coronavirus : वाढवा तुमची रोगप्रतिकारशक्ती

समाजमाध्यमांवरील संदेश खोटा 
प्रसार माध्यमांद्वारे (मुद्रित आणि इलेक्‍ट्रॉनिक) कोरोनासंदर्भातील खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येते. वृत्तपत्रांद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा खोटा संदेश पसरवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात यवतमाळ जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. त्यावरून पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no infection in the newspaper says tatyarao lahane