Coronavirus : महाराष्ट्र राज्यात शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

देशासह राज्यातील रेल्वेसेवा बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशासह राज्यातील प्रवासी रेल्वे सेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवाही रविवारी मध्यरात्री १२ नंतर बंद करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

‘जनता कर्फ्यू’मुळे महाराष्ट्र स्तब्ध; रस्ते ओस पडले 
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे जनता कर्फ्यूमध्ये राज्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार राज्यभर रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट होता. नागरिकांनी घरात बसण्यालाच प्राधान्य दिल्याने रस्ते ओस पडले होते. अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि कर्मचारी वगळता इतर कोणीही रस्त्यावर दिसत नव्हते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोलापूरात बंद
सोलापूर -
 सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद दिला. सायंकाळी मात्र रस्त्यावर उतरून जल्लोष करीत एकप्रकारे उत्सवच साजरा केला. त्यामुळे सोलापूरकरांना कोरोनाचा विसर पडला की काय, अशी स्थिती झाली. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. जिल्ह्यातील एकाही एसटीस्थानकावरून बस सुटली नाही.

भारतासह जगातील रोगांच्या साथी

नाशिकमध्ये कडकडीत बंद
नाशिक -
 तीर्थ-उद्यमनगरी, कृषी पंढरी, जगातील सर्वात मोठी कांदा-द्राक्षांची बाजारपेठ अन्‌ वाइन कॅपीटल ऑफ इंडिया नाशिक शहरासह आदिवासी-ग्रामीण भाग रविवारी जनता कर्फ्यूमध्ये स्तब्ध राहिला. कोरोना प्रतिबंधासाठी शहर आणि जिल्ह्यातील सर्व मार्गांवरील चेकपोस्टवर सोमवारी सकाळपासून तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

Coronavirus : रविवारी देशभरात असं काही घडलं की....

सांगलीत शंभर टक्के ‘कर्फ्यू’
सांगली -
 महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील शहर आणि  खेड्यांमध्ये आज १०० टक्के जनता कर्फ्यू पाळण्यात आला. सकाळी सातपूर्वी लोकांनी घर गाठले आणि त्यानंतर रस्त्यांवर चिटपाखरूही दिसले नाही. काही ठिकाणी उत्साही तरुणांनी दुचाकीवरून फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच अटकाव करत त्यांनी घराकडे हाकलले. सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा, तासगाव या प्रमुख शहरांसह जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या सर्व गावांनी शंभर टक्के बंद पाळला. 

शिर्डी विमानतळावर शुकशुकाट
पोहेगाव (जि.नगर) -
 पोहेगाव परिसरातील गावांमध्ये आज जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

रिक्षा, फेरीवाल्यांना कोट्यवधींचा फटका
मुंबई -
 ‘जनता कर्फ्यू’मुळे मुंबईतील सुमारे दोन लाख रिक्षाचालकांचे १५ कोटी रुपयांचे, तर तेवढ्याच फेरीवाल्यांचे सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहरातील आठ हजार हॉटेलचालकांनाही आज सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. या सर्वांना गेले काही दिवस मंदीमुळे उत्पन्न घटल्याचा अनुभव येतच होता. आज रिक्षा रस्त्यावर आल्याच नाहीत, तर हॉटेलही उघडली नाहीत. सुमारे दोन ते अडीच लाख फेरीवाले आहेत. यांची रोजची उलाढाल शंभर ते सव्वाशे कोटी रुपये असून, त्यांचे रोजचे उत्पन्न प्रत्येकी अंदाजे तीन ते चार हजार रुपये आहे, असे कामगार नेते शशांक राव यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

महाराष्ट्र-गोवा सीमा सील
बांदा -
 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज महाराष्ट्र-गोवा सीमा सील करण्यात आली. सीमेवर पत्रादेवी येथे गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांनी नाके उभारून वाहतूक बंद केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनता कर्फ्यु तीन दिवस जाहीर केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peace in the state of Maharashtra by coronavirus