साहेब, पोटापाण्याचे बोला! संजय राऊत यांची मोदींवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 4 April 2020

मोदी सरकारने प्रसिद्धीसाठीचे हे स्टंट बंद करावेत आणि रुग्णालये व्हेंटिलेटर, कोरोना चाचणी प्रयोगशाळा या आघाडीवर काम करावे. भारताला आता कृतीची गरज आहे, इव्हेंट मॅनेजमेंटची नाही.
- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

दिखाऊपणापेक्षा या साथीमुळे ज्या लोकांना त्रास होत आहे त्यांच्या 
आयुष्यात प्रकाश यावा यावर भर द्यावा. कृपया वास्तववादी व्हा आणि देशात खरा प्रकाश पसरवा.
- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ढोल वाजवले गेले. आता दिवे लावायला सांगितल्यावर आग लावली नाही म्हणजे झालं, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना लगावला. तसेच दिवा जळेलच, पण सरकारने ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केले ते सांगा, अशी मागणीही केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (ता. ५) रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केल्यानंतर राऊत यांनी मोदी यांच्या या आवाहनावर टीका केली आहे. ते म्हणाले, “मोदींनी लोकांना जेव्हा टाळ्या वाजवायला सांगितले, तेव्हा लोकांनी रस्त्यावर जमा होऊन ढोल वाजवले. आता त्यांनी स्वतःच्या घरालाच आग लावली नाही म्हणजे झाले. साहेब कामाचे आणि लोकांच्या पोटापाण्याचे बोला.” मोदींच्या या आवाहनावर काँग्रेसनेही निशाण साधला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे, 'कोरोना विषाणूने थैमान घातले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवे लावा, टाळ्या वाजवा, असे ‘इव्हेंट’ करून परिस्थितीचे गांभीर्य घालवत आहेत.’

काँग्रेसने आपल्या या ट्विटमध्ये एक हॅशटॅग वापरत मोदींनी देशापेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut Comment on Narendra Modi