#Lockdown2.0 : कोटातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी ‘एसटी’ सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

काय असू शकतात तांत्रिक अडचणी ?
कोटा शहरात जाताना गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान असे तीन राज्य लागणार आहे. या राज्यातील राज्य परिवहन विभागाचे परमिट घ्यावे लागणार आहे. त्यानंतर १०० गाड्यांसोबत एसटीचे २०० चालक, यांत्रिकी कर्मचारी जाणार आहे. यादरम्यान या राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याची मागणी होऊ शकते. ही प्रक्रिया परत येताना सुद्धा एसटी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना तपासणीला प्रत्येक ठिकाणी सामोरे जावे लागेल. त्यातही बसमध्ये या विद्यार्थ्यांना आणल्यानंतर विविध जिल्ह्यातील असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्याचे आव्हान सुद्धा राज्य शासनासमोर राहणार आहे.

मुंबई - राजस्थान राज्यातील कोटा येथे आयआयटी, मेडिकल अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी गेलेले विद्यार्थी लाकॅडाउनमुळे अडकले आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी एसटीच्या सुमारे १०० बस पाठवण्याचा विचार आहे. एसटी महामंडळ सज्ज असून, काही तांत्रिक अडचणींमूळे अद्याप राज्य शासनाचे आदेश दिले नसल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोटा येथे गेलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याने येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यात परत येण्यासाठी मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली असल्याचे, मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांनी ट्विट सुद्धा केले आहे. मात्र, अद्याप या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यावर एसटी महामंडळ, परिवहन विभाग आणि राज्य सरकारचे एकमत होऊ शकले नसल्याचे दिसून येत आहे. 

एसटी महामंडळाने आपल्या बस सज्ज करून ठेवल्या असून, एका चालकांला लांब पल्ला गाठता येणार नसल्याने, एसटीमध्ये दोन चालकाचे नियोजन सुद्धा केले आहे. तर विद्यार्थी आणताना आरोग्य सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन व्हावे यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय होत नसल्याने या विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे.

कोटा येथे लॉकडाउन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज आहे. त्यासाठी बसची पण सोय झाली आहे. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी असल्याने, राज्य शासनाकडून त्यावर निर्णय प्रलंबित  आहे. 
- अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: st ready for kota student return in maharashtra