बीड जिल्ह्यात वाड्या-वस्त्यांबरोबरच गल्लीबोळाही झाल्या सील 

आष्टी - जाण्यायेण्यासाठीचे रस्ते जेसीबी मशीनद्वारे खड्डे खोदून बंद करण्यात आले आहेत.
आष्टी - जाण्यायेण्यासाठीचे रस्ते जेसीबी मशीनद्वारे खड्डे खोदून बंद करण्यात आले आहेत.

आष्टी (जि. बीड) - कोरोनाच्या धास्तीने आष्टी तालुक्यातील वाड्यावस्त्यांबरोबरच आता गावागावांतील गल्लीबोळाही सील होत आहेत. आपल्याही गावात, गल्लीत येऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे.  आष्टी तालुका हा ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. कायम दुष्काळी भाग असल्याने या तालुक्यातील अनेकजण चरितार्थासाठी मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये जातात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॅकडाऊननंतर आष्टी तालुक्यात अशा स्थलांतरितांचे लोंढेच्या लोंढे परतू लागले. त्यामुळे तालुक्यातील स्थानिक चिंताग्रस्त होते. रात्री-अपरात्री दुचाकी किंवा चारचाकीने अनेकजण गावाकडे परतले. स्थलांतरितांचीही आवक सुरूच राहिल्याने अनेक गावांनी गावाकडे येणारे रस्तेच बंद करून टाकले. गावातून कोणी बाहेर जायचे नाही व बाहेरच्यांना गावात येऊ द्यायचे नाही, असा अलिखित नियमच करण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावे तसेच वाड्यावस्त्याही सील झाल्याचे दिसून येत आहे. स्थलांतरितांची यथायोग्य माहिती प्रशासनापर्यंत पोचली नसली तरी सुदैवाने गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. 

तालुक्याला लागून असलेल्या जामखेड येथील काहीजण तबलिगी जमातसाठी दिल्लीला गेलेल्यांच्या संपर्कात आल्याने कोरोनाग्रस्त झाले; तसेच तालुक्यातील अनेक गावे नगरला लागून आहेत. नगरमध्ये तबलिगींच्या थेट संपर्काने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज (बुधवारी) नगर हद्दीला लागून असलेल्या तालुक्यातील पिंपळा येथील एकजण कोरोनाबाधित झाल्याचे पुढे आले. हा रुग्ण नगर शहरातील आलमगीर भागात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला. जामखेड व नगरचा आष्टीशी नेहमीच संपर्क असतो. त्यामुळे आपल्याही गावात, गल्लीत लागण होऊ नये, म्हणून सतर्कता बाळगण्यात येत आहे. 

याच कारणाने तालुक्यातील खेड्यापाड्यांतील वाड्यावस्त्यांबरोबरच आता आष्टी, कडा अशा मोठ्या लोकवस्तीच्या गावांतही गल्लीबोळा सील करण्याचे सत्र सुरू आहे. आपण सगळे नियम पाळतो, पण तरीही गल्लीतून नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी गल्लीबोळाही काटे टाकून, अडथळे निर्माण करून सील करण्यात आल्या आहेत. फक्त पादचाऱ्यालाच या ठिकाणी प्रवेश करता येतो. दुचाकी-चारचाकी वाहने पूर्णपणे बंद आहेत. पाण्याचे टँकर, दूधवाले, घंटागाडीसारखी अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनाच प्रवेश देण्यात येत आहे. 

कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील पिंपळा या गावापासून तीन किलोमीटर अंतराच्या परिसरातील पिंपळ्यासह सुंबेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, ठोंबळसांगवी व खरडगव्हाण हा परिसर प्रशासनाने ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे. तसेच त्यापुढील चार किलोमीटर परिसरातील लोणी सय्यदमीर, नांदूर विठ्ठलाचे, सोलापूरवाडी, खुंटेफळ पुंडी, कोयाळ ही नगर जिल्हा हद्दीवरील गावे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंडसंहितेचे कलम १४४ नुसार अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा हे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com