कोरोना हॉटस्पॉ़ट; संचारबंदीनंतर कळव्यात शुकशुकाट 

किरण घरत
Tuesday, 7 April 2020

कोरोनाचे रोज नवे रुग्ण आढळत असल्याने कळवा, खारेगाव, विटावा परिसरात मंगळवारपासून (ता. 7) संपूर्ण संचारबंदी केल्यामुळे रस्त्यांवर 'शुकशुकाट' दिसून येत आहे. पोलिसांनी नाक्यानाक्यावर कडक बंदोबस्त ठेवला असून, सील केलेल्या परिसरात अनावश्यक फिरणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येत आहे.

कळवा (ठाणे) : कोरोनाचे रोज नवे रुग्ण आढळत असल्याने कळवा, खारेगाव, विटावा परिसरात मंगळवारपासून (ता. 7) संपूर्ण संचारबंदी केल्यामुळे रस्त्यांवर 'शुकशुकाट' दिसून येत आहे. पोलिसांनी नाक्यानाक्यावर कडक बंदोबस्त ठेवला असून, सील केलेल्या परिसरात अनावश्यक फिरणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येत आहे.  

क्लिक करा : एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता जाहीर

ठाणे शहरातील 'कोरोना'च्या रुग्णांपैकी निम्मे रूग्ण (9) कळवा परिसरात आढळून आल्याने या भागात भीतीचे वातावरण असतानाच सोमवारी (ता. 6) विटावा परिसरातील जकातनाका परिसरात नवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्यामुळे कळवा परिसरात रुग्णांची संख्या 10 वर गेली आहे. त्यानंतरही नागरिक गर्दी करत असल्याने पोलिसांनी सोमवारपासून परिसरात वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली.

तसेच खारीगाव रेतीबंदर, खारीगाव पुलाखालून येणारा रस्ता, विटावा जकात नाका, कळवा खाडीपूल अत्यावश्‍यक वाहनांच्या व्यतिरिक्त वाहतुकीसाठी बंद करण्यात आला; परंतु या परिसरात नवे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून महापालिका प्रशासन व पोलिसांनी कळवा परिसर मंगळवारपासून सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण परिसर निर्मनुष्य दिसून आला. 

महत्त्वाची बातमी : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत धोका वाढला

कळवा स्थानक परिसर, कळवा बाजारपेठ, जुना मुंबई रस्ता, कळवा नाका, विटावा, खारेगाव नाका, पारसिक नगर आदी सर्वच भागातील रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. फक्त औषधांची दुकाने सुरू असून त्यांनीही मागणीद्वारे घरपोच सेवा सुरू केली आहे. भाजीपाला दुकानेही बंद असून महापालिका या विक्रेत्यांना काही ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी देणार असल्याचे समजते. त्यामुळे सद्यस्थितीत पुढील निर्णय येईपर्यंत ही भाजीपाला दुकाने बंद राहणार आहेत. 

वाहतूक विभागाकडून वाहने जप्त 
    कळवा परिसरात कडेकोट बंदोबस्त असून गेल्या दोन दिवसांपासून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 42 वाहनांवर कळवा वाहतूक विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. त्यातील अत्यावश्‍यक सेवेतील किती वाहने आहेत, या संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती कळवा वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली. नागरिकांनी घराबाहेर येऊ नये, म्हणून कळवा पोलिसांनी हा वॉच सुरू केला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Hotspot; Silent after Curfew at Kalwa