esakal | महामार्गावरील हॉटेल मालक ठरतोय अन्नदाता 
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरील हॉटेल मालक ठरतोय अन्नदाता 

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेलही बंद असल्याने अत्यावश्‍यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या वाहनचालक, नागरिकांची खाण्या-पिण्याची परवड होत आहे. महामार्गावरील शहापूर तालुक्‍यातील खर्डी येथील हॉटेल फाऊंटनच्या मालकाने सामाजिक बांधिलकी दाखवत या वाहनचालक व पायी जाण्याऱ्या वाटसरूंना मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे. अन्नदाता ठरलेल्या हाफिजी फरहान इरफान डुक्का यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. 

महामार्गावरील हॉटेल मालक ठरतोय अन्नदाता 

sakal_logo
By
नरेश जाधव

खर्डी (ठाणे) : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेलही बंद असल्याने अत्यावश्‍यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या वाहनचालक, नागरिकांची खाण्या-पिण्याची परवड होत आहे. महामार्गावरील शहापूर तालुक्‍यातील खर्डी येथील हॉटेल फाऊंटनच्या मालकाने सामाजिक बांधिलकी दाखवत या वाहनचालक व पायी जाण्याऱ्या वाटसरूंना मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे. अन्नदाता ठरलेल्या हाफिजी फरहान इरफान डुक्का यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. 

वाचा नक्की  : कोरोना हॉटस्पॉट; संचारबंदीनंतर कळव्यात शुकशुकाट 

संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्‍यक सेवा देणारी वाहने सुरू आहेत. यात दुधाचे टॅंकर, वैद्यकीय वस्तू, भाजीपाला, रुग्णवाहिका आदी वाहनांचा समावेश होते. त्यातच संचारबंदीत अनेक वाहने गेल्या 10 ते 15 दिवसांपासून अडकून पडली आहेत. लॉकडाऊनमुळे मुंबई परिसरातून अनेकांनी पायपीट करत आपापल्या गावांची वाट धरली आहे. या सर्व नागरिकांच्या खाण्या-पिण्याची वाटेत व्यवस्था होईल याची शाश्वती नाही. 

हीच बाब लक्षात घेऊन हाफिजी डुक्का यांनी आपले हॉटेल बंद असले तरी सामाजिक जाणीवेतून वाहनचालक आणि वाटसरूंना दुपार आणि रात्रीचे मोफत जेवण, तसेच दिवसभर चहा, पिण्याचे पाणी देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून याठिकाणी सुमारे 300 जणांची मोफत व्यवस्था ते करीत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी तसेच नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव आदी भागातून येणाऱ्या वाहनचालकांना खर्डीतील हे हॉटेल फाऊंटन जेवणासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. 

महत्त्वाचे : कोरोनामुळे लगाम; दादा, भाई झाले क्वारंटाईन

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्याच्या हद्दीत मोठ्या संख्येने हॉटेल आहेत. मात्र, हाफिजी डुक्का यांनी सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. महामार्गावरील इतर हॉटेल मालकांनीही हीच सामाजिक बांधिलकी जोपासून वाहनचालक, गरजू नागरिकांची जेवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन केले जात आहे. 

रस्त्यावरून पायी जाणारे मजूर, ट्रकचालक यांचे लॉकडाऊनमुळे खाण्या-पिण्याचे मोठे हाल होत आहेत. यासाठीच गेल्या दहा दिवसांपासून आम्ही दररोज सुमारे 300 नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळून दोन वेळ जेवण, चहा-नाश्ता आदीची मोफत व्यवस्था करीत आहोत.
- हाफिजी फरहान इरफान डुक्का
हॉटेल व्यावसायिक

मुंबई-आग्रा महामार्गावर 200 ते 300 मीटर अंतरावर अनेक मोठी हॉटेल आहेत. परंतु एकाही हॉटेल मालकाने माणुसकी दाखवली नाही. या हॉटेलमालकांनी पुढे येऊन ट्रकचालक, गरजू नागरिकांच्या जेवण्याची व्यवस्था करावी. 
- मोसीम शेख
स्थानिक ग्रामस्थ 

loading image