लॉकडाऊनमध्ये सुक्या मासळीला भाव 

दीपक घरत
Sunday, 5 April 2020

लॉकडाऊनमुळे बाजारात सध्या ताजी मासळी उपलब्ध होत नसल्याने खवय्ये सुकी मच्छी खरेदी करण्यास पसंती दिल्याचे चित्र पनवेलमध्ये दिसते. त्यातच मटणाप्रमाणे सुक्या मासळीनेही भाव खाल्ल्याने ग्राहकांना नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात खिसा खाली करावा लागत आहे. चिकन-मटणाप्रमाणे सुक्या मच्छीच्या खरेदीसाठीही नागरिक रांगा लागल्याचे नजरेस पडते. 

पनवेल : लॉकडाऊनमुळे बाजारात सध्या ताजी मासळी उपलब्ध होत नसल्याने खवय्ये सुकी मच्छी खरेदी करण्यास पसंती दिल्याचे चित्र पनवेलमध्ये दिसते. त्यातच मटणाप्रमाणे सुक्या मासळीनेही भाव खाल्ल्याने ग्राहकांना नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात खिसा खाली करावा लागत आहे. चिकन-मटणाप्रमाणे सुक्या मच्छीच्या खरेदीसाठीही नागरिक रांगा लागल्याचे नजरेस पडते. 

नवी मुंबईत कोरोना जनजागृतीसाठी इंटरनेट रेडिओ

 सुक्या मच्छीचा बाजार आता चांगलाच वधारला आहे. एकदा खरेदी करून ठेवलेल्या सुक्या मच्छीचा साठा अनेक दिवस पुरत असल्याने लॉकडाऊनच्या कालावधीत खवय्ये आधार म्हणून ही मच्छी मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले आहेत. परंतु मागणी वाढल्याने असलेला साठा देखील संपुष्टात येऊ लागल्याचे विक्रेते सांगतात. रविवारी अनेक भागात सुक्या मच्छीच्या दुकानाबाहेर रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

लॉकडाऊन काळात इतर भाजीपाल्याप्रमाणे चिकन, मटणाचा समवेशही अत्यावश्यक सेवेत केल्याने अनेक भागातील चिकन आणि मटणाची दुकाने ठराविक वेळेत खुली असतात. मात्र बाजारात बकऱ्यांची आवक होत नसल्याने परवानगीनंतर देखील मटण विक्रीची अनेक दुकाने बंद आहेत.

क्वारंटाईन व्यक्तीने पळ काढल्याने गावात धस्स!

तर चिकन खाल्ल्याने कोरोनाचा संसर्ग होत नसल्याचा खुलासा झाला असला तरी अद्यापही अनेक नागरिक चिकन खाण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक भागातील मच्छीमारी सुद्धा बंद असल्याने रोजच्या जेवणात मांसाहार करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

दरम्यान, रविवार सारख्या दिवशी सुक्या मच्छीकडे ढुंकूनही न पाहणारे खवय्ये या मच्छीच्या दुकानाबाहेर रांगा लावून उभे राहत असल्याचे कधी न पाहायला मिळणारे दृष्य सध्या पनवेलमध्ये पाहायला मिळत आहे.

सुक्या मच्छीचा बाजारभाव

अंबाडी      : 560 रुपये किलो.

जवळा-सुकट : 320 रुपये किलो.

वाकटी      : 480 रुपये किलो.

सुरमई      : 900 रुपये किलो.

बोंबील (आकारानुसार) : 500 ते 560 रुपये किलो

बांगडा (आकारानुसार) : 25 ते 30 रुपये प्रत्येकी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Price raised of dry fish in lockdown