अनुभव सातासमुद्रापारचे... : भारतीय आणि महिलांचा सकारात्मक पुढाकार

अपर्णा पुंडलीक-आफळे, सिॲटल, अमेरिका
Wednesday, 22 April 2020

कोरोनाने सगळ्यांनाच आपल्या क्षमता व कौशल्ये पुन्हा एकदा तपासायला लावली आहेत. आपण व्याप ताप संताप म्हणतो. `अमेरिका फर्स्ट` हे कोरोनाचे बाधित व मृत्यू यांच्याबाबतही खरे होत असल्याने येथे घबराट आहे. लॉकडाउन कधी संपणार, सारे व्यवहार सुरळीत कसे होणार, नोकरी टिकेल ना, व्यवसाय पुन्हा उभे करण्यासाठी किती दिवस जातील याची चिंता येथे प्रत्येकाला आहे.

कोरोनाने सगळ्यांनाच आपल्या क्षमता व कौशल्ये पुन्हा एकदा तपासायला लावली आहेत. आपण व्याप ताप संताप म्हणतो. `अमेरिका फर्स्ट` हे कोरोनाचे बाधित व मृत्यू यांच्याबाबतही खरे होत असल्याने येथे घबराट आहे. लॉकडाउन कधी संपणार, सारे व्यवहार सुरळीत कसे होणार, नोकरी टिकेल ना, व्यवसाय पुन्हा उभे करण्यासाठी किती दिवस जातील याची चिंता येथे प्रत्येकाला आहे. पण असे असतानाही येथील भारतीय मदत कार्यात पुढे आहेत. किंबहुना मदतीचा हात भारतीयांनी पहिल्यांदा पुढे केला आणि मग इतरांनी तो धडा गिरवला असे दिसत आहे. येथील महिला कणखर आहेत. त्या कुटुंबाची काळजी घेत इतरांचाही विचार करताना दिसत आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थी ऑनलाईन क्लासमध्ये शिकत आहेत. ही मुले एकमेकांशीही ऑनलाईन जोडलेली आहेत. नॉर्थ कॅरोलिनातील भारतीय शाळकरी मुलांनी `लिटील हँड, बिग इम्पॅक्ट` अशी मोहीम सुरू केली. या मुलांच्या समुहाने आपले खाऊचे पैसे यात जमा केले आणि गरीबांच्या अन्नासाठी दिले. प्रसारमाध्यमांनी या मोहिमेचे कौतुक केले. माझी मुलगी युक्ता तिची युनिव्हर्सिटी सध्या बंद असल्याने घरूनच ऑनलाईन शिक्षण घेते आहे. येथील एका स्टोअरमध्ये मदतीची गरज असल्याचे कळल्यावर ती आता रोज काही वेळ तिथे जात आहे. येथे मास्कची कमतरता आहे. सान्वी या भारतीय मुलीने घरीच मास्क कसे बनवता येतील याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि अनेक महिला असे मास्क तयार करून किफायतशीर दरात उपलब्ध करीत आहेत. 

अत्यावश्यक सेवेतील लोकांना कामावर जाणे आवश्यक आहे. यातील बऱ्याचशा क्षेत्रात महिलाच अधिक संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी डे केअर सेंटर सुरू आहेत. ज्येष्ठांसाठी असलेल्या केअर सेंटरमधील महिला स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांसारखी ज्येष्ठांची काळजी घेताना दिसत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना घरीही परतता येत नाही. डॉ. स्टीफनी आपल्या कुटुंबाला व सोसायटीतील इतरांना बाधा होऊ नये यासाठी गेले कित्येक दिवस रुग्णालयाने व्यवस्था केलेल्या ठिकाणीच राहात आहे. केकचा व्यवसाय करणारी एल्सा घरी केक करून पोचवते आहे. नेदरलँडला तिचे कुटुंबीय आहेत, त्यांनाही मदत पाठवते आहे.

सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी कायला सध्या घरून कितीतरी आघाड्या सांभाळत आहे. स्वतःचे काम, मीटिंग्ज, कॉल, नोकरीची चिंता व कोरोनाची भीती वाटणाऱ्या सहकाऱ्याला धीर देणे, आपल्या लहान मुलांची काळजी घेणे एकाच वेळी निभावते आहे. अमेरिका कोरोनाशी लढते आहे. त्याचवेळी आमच्या क्षमता व कौशल्ये कसाला लागत आहेत. 
(शब्दांकन - संतोष शेणई)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article aparna pundlik aafale