अनुभव सातासमुद्रापारचे... : पदवी, प्लेसमेंट सारेच लांबणीवर

Vaibhav-Joshi
Vaibhav-Joshi

मी व माझे भारतीय मित्र सूरज, मयूर व विघ्नेश अमेरिकेत मिशिगनमध्ये ऑकलॅंड युनिर्व्हसिटीमध्ये एम.एस. (मॅकेनिकल इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहोत. एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतो. एप्रिल हा आमचा अभ्यासक्रमाचा शेवटचा महिना. याच महिन्यात आमचा पदवीदान समारंभही होता. आमचे चौघांचेही पालक या समारंभासाठी येणार होते. पदवी मिळणार आणि घरच्यांचीही भेट होणार म्हणून सगळे आनंदात होतो. आईबाबा, भावंडांना फिरायला घेऊन जाण्याचे, सहलीचे बेत आखले होते. त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच पार्टटाईम नोकरी करून मिळालेले काही पैसे बाजूला ठेवले होते. पदवीदान समारंभाची आतुरतेने वाट पाहात होतो आणि तो दिवस उजाडला...

एखाद्या चित्रपटात घडावे, तसे एका दिवसात सारेच बदलून गेले. नवीन जगात पाऊल टाकायला उत्सूक असणारे आम्ही सारेच लॉकडाउनच्या एका फटक्‍याने मागे फेकले गेलो. सुरुवातीला वाटले, थोडे दिवस हे चालेल आणि संपेलही... सगळा धीर एकवटून, घरच्यांची आठवण काढत राहात होतो. परंतु जेव्हा महिनाभर बंदी वाढविली, तेव्हा मात्र मानसिक धक्का बसला. ही शिक्षा वाटू लागली. घरापासून लांब असताना या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी सारे मनोबल एकवटावे लागले.

दहा मार्चपासून येथ बंद आहे.  वसतिगृहेही रिकामी केली आहेत. फक्त गरजू विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी आहे. त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्था जेवणाचे डबे पुरवत आहेत. माझ्यासारखे जे अपार्टमेंटमध्ये राहतात, ते स्वत:च जेवण तयार करून खातात. विद्यापीठांनी तत्कालीन सेवेसाठी हॉटलाइन सुरू केली आहे. ज्यांना काही अडचण असेल, त्यांनी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. विद्यापीठातर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतनिधी उभारला जात आहे. सगळे क्‍लास बंद असून, घरी बसून स्काइप, झूम अशा ऍपच्या सहाय्याने इ- लर्निंग सुरू आहे. ग्रंथालयांनी इ- बूकची सोय केली आहे. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर एका दिवसात हे सारे सुरू झाले. कोठेही गडबड नाही, गोंधळ नाही. परीक्षासुद्धा नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाइन होत आहेत.

अभ्यास, परीक्षा सारे सुरू असले तरी त्याच्या पद्धतीत एकदम झालेला बदल पचवणे अवघड होते. आम्ही सगळेच नोकरी करत असल्यामुळे दिवसभर ऑफिसचे काम, अभ्यास, घरकाम करून काही छंदही जोपासतो. घरच्यांशी, मित्रमैत्रिणींशी फोनवर गप्पा मारतो. चित्रपट, वेबसिरिज बघतो. पाककलेचे वेगवेगळे प्रयोग करतो. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी या कठीण प्रसंगातून जात आहेत. पदवी, प्लेसमेंट, नोकरी सारेच लांबणीवर पडले आहे. आता एक प्रश्‍नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे, यातून कसे व कधी बाहेर पडणार?
(शब्दांकन ः नयना निर्गुण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com