सांगलीतील दुर्गामाता दौडीची 35 वर्षांची परंपरा खंडीत

बलराज पवार
Saturday, 17 October 2020

पुढच्या वर्षी पुन्हा तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात सुरु

सांगली : शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी होणारी सांगलीची दुर्गामाता दौड केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातही साजरी केली जाते. सांगलीत 1985 पासून सुरु झालेल्या या दौडीची परंपरा यंदा प्रथमच खंडीत झाली ती कोरोना महामारीमुळे. प्रशासनानेकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दौड काढू  नये अशी विनंती केल्यानेशिवप्रतिष्ठानने त्याला प्रतिसाद देत यंदा दौड न करण्याचा निर्णय घेतला.पण या दौडीचे आकर्षण कायम आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी 1985 साली तरुणांचे संघटन करण्याच्या उद्देशाने सांगलीत दुर्गामाता दौडीची सुरुवात केली. याचा उद्देश केवळ तरुणांचे संघटन असाही नव्हता तर नवरात्रात देवीला धावत जाऊन तिचे दर्शन घ्यायचे आणि तिची आरती करुन तरुणांमध्ये राष्ट्राप्रती लोकजागृती करणे हा उद्देशही त्यामागे होता. घटस्थापने दिवशी
पहाटे पाच वाजता सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शहरातील तरुण एकत्र येतात आणि तेथे शिवरायांना वंदन करुन ध्येयमंत्र म्हणत दौडीस सुरुवात होते.

हेही वाचा- तोफेची सलामी आणि‌ घटस्थापना...! करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ -

दौडीच्या अग्रभागी भला थोरला भगवा ध्वज घेऊन
धारकरी धावत असतात. त्यांच्या मागे हजारोंच्या संख्येने तरुण धावत असतात.शहरातील मुख्य मार्गावरुन माधवनगर रोडवरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर दौड थांबते. तेथे दुर्गामातेची आरती करुन वंदन करण्यात येते. तेथून पुन्हा शहरातील विविध भागात दौड जाते. प्रत्येक भागात दौडीचे मोठ्या उत्साहात स्वागत होते. रांगोळी काढून, घरांवर भगवे ध्वज उभारुन काही ठिकाणी फटाके उडवून दौडीचे स्वागत केले जाते. अशा उत्साही वातावरणात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दौडीची सांगता होते. सलग नऊ दिवस ही दौड होते. दसऱ्या दिवशी दौडीची सांगता होते.

त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या दुर्गमोहीमेची घोषणा होते. हा गेल्या तीन दशकांचा प्रघात आहे. दरवर्षी जानेवारीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गमोहीम आयोजित केली जाते. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकिल्ले तरुणांनी पायी जाऊन पहावे, त्या ऐतिहासिक किल्ल्यांची अनुभूती घ्यावी. छत्रपतींच्या मावळ्यांसारखे जाज्वल्य राष्ट्रप्रेम तरुणांच्या अंगी यावे या उद्देशाने ही दुर्गमोहीम आयोजित केली जाते. त्याची घोषणा दसऱ्या दिवशी दुर्गामाता दौडीच्या सांगते वेळी संभाजीराव भिडेगुरुजी करतात.दुर्गामाता दौडीची ही ख्याती हळूहळू राज्यभर पसरली.

हेही वाचा- सनई, तुतारी, ढोल, ताशाच्या निनादात दख्खनचा राजा श्री . जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास प्रारंभ - 

संभाजीराव भिडेगुरुजींनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन तरुणांमध्ये छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास व्याख्यानातून सांगून त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागवले. त्यामुळे आता राज्यातील पुणे, मुंबईसह कोकण,मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्येही दुर्गामाता दौड आयोजित केली जाते.गोंदिया, गडचिरोलीतही ही दौड होते. त्याचबरोबर शेजारच्या गोवा, कर्नाटकआणि मध्यप्रदेशमधील काही शहरांमध्येही दौडीची परंपरा सुरु झाली आहे.

सध्या भारतमातेवर आणि जगावरही कोरोनाचे संकट आहे. ते लवकर दूर होऊ दे अशी आमची श्री दुर्गामातेकडे प्रार्थना आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये यासाठी जत्रा, यात्रा तसेच धार्मिक कार्यक्रमांवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे दुर्गामाता दौडही होणार नाही. याची हुरहूर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना आहे. पुढच्या वर्षी पुन्हा तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात सुरु करु.
श्री. नितीन चौगुले, कार्यवाह, शिवप्रतिष्ठान

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 years tradition of Durga Mata Daud sangli story by balraj pawar