"आयटी'मध्ये 16 टक्‍के कर्मचाऱ्यांनाच परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) अत्यावश्‍यक सेवांसाठी केवळ 16 टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार हिंजवडीसह खराडी आणि तळवडेतील "आयटी' कंपन्यांत 50 ते 55 हजार आयटीयन्स काम करीत आहेत.

पुणे - माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) अत्यावश्‍यक सेवांसाठी केवळ 16 टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार हिंजवडीसह खराडी आणि तळवडेतील "आयटी' कंपन्यांत 50 ते 55 हजार आयटीयन्स काम करीत आहेत. गर्दी टाळण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कामांचे नियोजन आहे. गरजेपेक्षा अधिक लोकांना बोलविल्यास संबंधित कंपनीला नोटीस देण्याची कार्यवाही राज्य सरकार करणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयटीयन्ससह विद्युत, सुरक्षारक्षक, सफाई आणि कॅन्टीनमधील कामगार कंपन्यांत आहेत. कंपन्यांत रोज किती आणि कोणत्या विभागातील अधिकारी व कर्मचारी येतात, याची माहिती घेतली जात आहे, असे औद्योगिक विकास महामंडळाने स्पष्ट केले. 

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, खराडी इऑन आणि तळवडेमध्ये एकूण 190 आयटी कंपन्या आहेत. त्यापैकी हिंजवडीतील 145 कंपन्या असून, तिथे तीन लाखांहून अधिक जण काम करतात. तर, इऑन आणि तळवडेतील साधारणपणे एक लाख जण आहेत. 

राज्यात संचारबंदी ; जिल्ह्यांच्या सीमाही बंद 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी आणि खासगी कार्यालयांत गर्दी कमी केली आहे. त्यानुसार जेमतेम पाच टक्के अधिकारी व कर्मचारी बोलविण्याचा आदेश आहे. मात्र, काही आयटी कंपन्यांतील कामे सुरू असल्याने त्या ठिकाणी गर्दी होत असल्याच्या तक्रारी होत्या. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करून कामकाज बंद करण्याची सूचना कंपनी व्यवस्थापनाला केली. त्यातच आता अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच व्यवहार थांबविले आहेत. तेव्हा आयटी कंपन्यांमधील कामाचे स्वरूप, आयटीयन्स, त्यांच्या वेळा आणि कमीत कमी अपेक्षित कर्मचारी, याचा आढावा घेऊन गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यास व्यवस्थापनाला बजावले आहे, असे महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी सांगितले. 

आयटी कंपन्यांमधील अत्यावश्‍यक सेवांसाठी काही अधिकारी व कर्मचारी हवे आहेत. मात्र, तेही एकाच वेळी येऊन गर्दी करणार नाहीत, याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. खबरदारीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांना कार्यवाहीला तोंड द्यावे लागेल. 
- संजीव देशमुख, प्रादेशिक अधिकारी, पुणे एमआयडीसी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 percentage of IT employees are allowed