coronavirus :भोर शहरातील गर्दीची प्रशासनाकडून गंभीर दखल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.पोलिसांनी बळाचा वापर केल्याने, तसेच गर्दी होत असलेली दुकाने बंद करण्यास सांगितल्याने दुपारनंतर गर्दी कमी झाली होती.

भोर - आठवडे बाजार बंद असूनही मंगळवारी (ता. ७) शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. नियमाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर केल्याने, तसेच गर्दी होत असलेली दुकाने बंद करण्यास सांगितल्याने दुपारनंतर गर्दी कमी झाली होती. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बँका आणि किराणा मालाच्या दुकानासमोर प्रामुख्याने गर्दी होती. अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांनी पोलिसांचेही एेकले नाही. त्यामुळे प्रांताधिकारी जाधव यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार अजित पाटील आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांच्यासमवेत दुपारी तातडीने बैठक घेतली. त्यानुसार गर्दी करणाऱ्यांवर पोलिस, नगरपालिका आणि महसूल विभाग एकत्रितपणे कारवाई करणार आहेत. 

आणखी वाचा - सोशल व्हायरसपासून सावधान, कोरोनापेक्षाही जास्त धोका

गर्दी टाळण्यासाठी भोर शहरातील रस्त्यांवर दुचाकीसह सर्व गाड्यांना बंदी करण्यात येणार आहे. शहरात येणारे चारही दिशेचे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीची चौकशी करूनच त्यास प्रवेश दिला जाणार आहे, असे उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांनी सांगितले. 

पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नगरपालिका तसेच महसूल विभागामार्फत अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. 

खबरदारीचे आवाहन करूनही नागरिक त्याकडे गांभिर्याने लक्ष देत नाहीत, त्यामुळे प्रशासनाने नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. 
- राजेंद्रकुमार जाधव, प्रांताधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: administration has taken serious note of the huge crowds in Bhor