लोकहो, 'सोशल व्हायरस'पासून सावधान! कारण हा व्हायरस कोरोनापेक्षा आहे डेंजर...

दीपक शेलार
Tuesday, 7 April 2020

EMI बाबत बँकांच्या नावे बनावट लिंक पाठवल्या जातायत, त्या अजिबात क्लिक करू नका   

ठाणे : कोरोनाने देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. उद्योगधंदे, व्यवसाय व हातावर पोट असलेल्या रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांसह सर्व प्रकारच्या कर्जाच्या ईएमआयला तीन महिन्यांसाठी तात्पुरती स्थगिती देऊन रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना बँकांच्या हप्त्यांबाबत दिलासा दिला. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करण्याचे निर्देश दिले. मात्र, कोरोनाच्या या स्थितीचा लाभ उठवत काही सायबर भामटे ग्राहकांच्या मोबाईलवर बँकांच्या नावे बनावट लिंक पाठवून लूट करण्याची शक्यता असल्याने ठाणे पोलिसांनी जनजागृती सुरू केली आहे. सोशल मीडियातील कोणतेही मेसेज, लिंक आदींना प्रतिसाद देऊ नये किंबहुना ओटीपी देणे टाळावेच, असे आवाहन केले आहे.

मोठी बातमी - लॉकडाऊनमध्ये किराणा दुकानात जातायत ? 'या' गोष्टींची पूर्ण काळजी घ्या...

सरकारने नागरिकांनी घरात बसून डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केले. त्यानुसार अनेक जण नेटबँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असून ऑनलाईन शॉपिंग, नेटबँकिंगद्वारे एनईएफटी, आरटीजीएस पर्याय वापरून गृहकर्ज, वाहनकर्ज, विम्याचे हप्ते यासारख्या दैनंदिन व्यवहाराची उलाढाल करीत आहेत. याचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, सोशल मीडियामध्ये बनावट मेसेज, अॅप व लिंक प्रसारित करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा मेसेज अथवा भूलथापांना बळी पडल्यास ईमेल आयडी हॅकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डविषयक गुन्हे, इंटरनेट बँकिंग आणि इंटरनेट हॅकिंगचे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे.

एखाद्या ऍप अथवा लिंकद्वारे ग्राहकाचा संपूर्ण डेटा मिळवून त्याच्या खात्यातील रक्कम वळती होण्याचा धोका आहे. तेव्हा नागरिकांनी ईएमआयबाबत संभ्रमित करून तुमच्या खात्याची माहिती कोणी मागत असेल, तर सावध राहा.अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नका. अशा पद्धतीने कोणी तुम्हाला संपर्क साधात असेल, तर त्याची माहिती सायबर सेलला द्यावी, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

मोठी बातमी - कोरोना टेस्टिंगसाठी 'फोन बूथ'; कोरोनाला लढा देण्यासाठी मुंबईत अनोखा प्रयोग

रिझर्व्ह बँकेने 'मोराटोरिअम' म्हणजेच सर्व प्रकारच्या बॅंक ईएमआयना तात्पुरती स्थगिती व विलंबादेश काढून उपाययोजना केली. वास्तविक रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते तीन महिने थांबवण्याचा सल्ला बँकांना दिला असून यावर निर्णय संबंधित बँकांनी घ्यायचा आहे. याचाच गैरफायदा घेत भामटे सोशल मीडिया त अथवा नागरिकांच्या मोबाईलवर बँकांच्या नावे बनावट अॅप, मेसेजेस, लिंक पाठवून सेवेचा आव आणून किंवा सीबिल रिपोर्टची भीती दाखवून ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. अशा वेळी थेट बँकेशी संपर्क साधावा. - ओ. पी. जांगिड, चार्टड अकाऊंटंट

मोठी बातमी - धारावीकरांनो सावधान ! आज 'ही' धक्कादायक बातमी आली समोर...

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडुन नेहमीच जनजागृती केली जाते. शिवाय केंद्रीय गृह मंत्रालयाकडून @CyberDost या नावाने ट्विटर हँडल सुरू आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बँकांमधील विविध कर्जाच्या ईएमआयबाबत बोगस कॉल अथवा लिंक सोशल माध्यमात येत आहेत. नागरिकांनी बँकेचा युजर आयडी, एटीएम, डेबिट कार्डचा क्रमांक व पीन, पासवर्ड देऊ नये. - संजय जाधव, पोलिस उपायुक्त सायबर सेल, ठाणे गुन्हे शाखा.

don't click malicious links about EMI moratorium during novel corona virus crisis


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don't click malicious links about EMI moratorium during novel corona virus crisis