Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांकडून बेपर्वाई

DJ
DJ

पिंपरी - कोरोना गंभीर संसर्गजन्य विषाणू. गेल्या पंधरा दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पोलिस ॲलर्ट झाले आहेत. मॉल, सिनेमागृहे बंद ठेवले आहेत. बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली. पीएमपीने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्या. देहू, आळंदी व चिंचवड देवस्थानने मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवली. नागरिकांसाठी महापालिका मुख्यालयात ‘नो एंट्री’ आहे. अनेक कार्यक्रम, लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. ‘आयटी’ कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले आहे. हे सर्व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना. मात्र, अनेकांना त्याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे शहरात बुधवारी (ता. १८) फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. पिंपरी कॅम्पातील दुकाने सुरू होती. नागरिकांचीही गर्दी होती.

निर्णयाला तिलांजली
पिंपरी-चिंचवड व्यापारी महासंघ व सराफ असोसिएशनने बुधवारपासून दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत व्यापाऱ्यांना कळविले आहे. सराफ दुकाने ८० टक्के बंद आहेत. मात्र, पिंपरी कॅम्पातील व्यापाऱ्यांनी दुपारपासून दुकाने उघडली. नागरिकांचीही वर्दळ वाढली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे धोकादायक आहे.

त्याबाबत असोसिएशनकडे विचारणा केली असता, प्रसिद्धी प्रमुख मनीष सोनीगरा म्हणाले की, पिंपरी कॅम्पातील दुकाने सुरू आहेत. ती बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. एसएमएसद्वारे निरोप दिला जात आहे. मात्र कापड, हार्डवेअर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रिकल व अन्य वस्तूंच्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली आहेत. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, ‘आमच्या मार्केटमध्ये अन्य दुकाने सुरू आहेत.

माझे एक दुकान बंद ठेवले, तर काय फरक पडणार?’ असे उत्तर मिळते आहे. तरीही दुकाने बंद ठेवण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. अखेर त्यांनी न ऐकल्यास सरकारला पोलिसांच्या मदतीने जबरदस्तीने दुकाने बंद करावे लागतील.

दुकानदारांप्रमाणेच नागरिकांनीही स्वतःहून काळजी घेतली पाहिजे. स्वयंशिस्त पाळली पाहिजे.

खवय्यांची गर्दी
अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. चारपेक्षा अधिक जण एका ठिकाणी थांबू नका, अशा सूचना आहेत. पण, याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. आळंदी-पुणे रस्त्यावर वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होली फाटा परिसरातील मोठी दुकाने, हॉटेल्स सुरू आहेत. नागरिकांची तिथे गर्दी असते. स्पाइन रस्त्यावरील सावरकर चौक, संतनगर चौक येथील चौपाटी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तिथे खवय्यांची गर्दी होती.

हीच स्थिती निगडीतही बघायला मिळाली. पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट, आकुर्डी, निगडीतील बहुतांश मोठी दुकाने, मॉल सुरू होती. व्यापारी असोसिएशनने बुधवार व गुरुवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असताना काही व्यापाऱ्यांनी मात्र दुकाने अर्धवट उघडी ठेवली होती. पिंपरी कॅम्प, चिंचवड, काळेवाडी भागात असे चित्र बुधवारी बघायला मिळाले. 

‘लोक ऐकत नाही हो’
पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवले आहे. त्यांच्यासाठी आयसोलेशन कक्ष आहेत. वायसीएममध्ये माहिती घेत असताना दोन व्यक्ती रुग्णालयात आल्या. त्यांच्यासोबत पाच वर्षांचे मूलही होते. एक व्यक्ती रुग्णाला भेटण्यासाठी आत गेले. तरुणासोबत मुलगा बाह्यरुग्ण विभागात थांबला होता. तो पॉपकॉर्न खात होता. हातातून खाली पडलेले पॉपकॉर्न त्याने खाल्ले. ते पाहून त्याला हटकले. त्याला बाहेर घेऊन जाण्याबाबत तरुणाला सांगितले. लहान मुलांना घेऊन वॉर्डात प्रवेश कशाला देता, असे सुरक्षारक्षकांना विचारले. त्यावर ‘लोक ऐकत नाही, असे उत्तर मिळते,’ असे त्यांनी सांगितले.

‘जिजामाता’मध्ये आयसीयू कक्ष
जिजामाता रुग्णालयात नवीन अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीची प्रक्रिया महापालिकेच्या भांडार विभागाने सुरू केली. चौदा बेडचा आयसीयू वॉर्ड असेल. सध्या १० बेड, पाच व्हेंटिलेटर, प्रत्येकी १० सिरिंग पंप व इन्फ्यूझन पंप यांसह ३१ प्रकारचे साहित्य खरेदी केले जाणार आहे. 

वायसीएम, ‘भोसरी’साठी साहित्य
वायसीएम व भोसरी रुग्णालयात आय सोलेशन कक्ष सुरू आहेत. त्यासाठी लागणारे एन-९५ मास्क २०००, पीपीई किट (वैयक्तिक सुरक्षा किट) २१५, यूज ॲण्ड थ्रो मास्क दोन लाख, हॅण्ड वॉश तीन हजार बॉटल असे साहित्य पुरविण्याचा आदेश पुरवठादाराला महापालिका भांडार विभागाने दिला आहे. सध्या हे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यात एन-९५ मास्क २१२, पीपीई किट (वैयक्तिक सुरक्षा किट) ३२०, यूज ॲण्ड थ्रो मास्क पाच हजार ३००, हॅण्ड वॉश बॉटल ७९० यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com