बाप रे : राज्यात 4 लाख 90 हजार कोरोना रुग्णांची शक्यता; पुण्याचा आकडा 40 हजारांवर जाण्याचा धोका 

योगिराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 9 April 2020

राज्यातील रूग्णसंख्या चार लाख 90 हजार होण्याची शक्‍यता आहे तर पुण्यात हा आकडा चाळीस हजाराच्या घरात असेल. 

पुणे -आगामी दोन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग किती वेगाने वाढेल, याचा वेध "एसईआयआर' (सस्पेक्‍टीबल-एक्‍स्पोजर, इन्फेक्‍शिअस, रिमुव्हड ऑर रिकव्हर्ड) या प्रारुपाच्या आधारावर सरकारी आरोग्य यंत्रणांनी घेतला आहे. त्यानुसार 15 जूनपर्यंत राज्यातील रूग्णसंख्या चार लाख 90 हजार होण्याची शक्‍यता आहे तर पुण्यात हा आकडा चाळीस हजाराच्या घरात असेल. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरापासून ते गाव, वाड्या- पाड्यापर्यंतच्या प्रत्येकाला सांगितलं जातंय की, "उंबरा ओलांडू नका'. याचं कारण, कोरोना विषाणू आता कुठं सातासमुद्रापार नाही. तर, तो तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलाय. तुम्ही उंबरठा ओलांडला की, तो तुमच्या घरात येणार, असा इशारा साथरोग तज्ज्ञांनीच दिलाय. म्हणून तुम्ही उंबरठा ओलांडून नकाच. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस, वैद्यकीय तज्ज्ञ हे सगळेजण कळकळीने तुम्हा सगळ्यांना सांगतात, ते गांभीर्याने घ्याच. 

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्चला आढळला. त्याला येत्या गुरुवारी (ता. 9) एक महिना होत आहे. या महिन्याभरातच रुग्णांच्या संख्येने हजाराचा टप्पा ओलांडला. या दरम्यान मुंबई, पुण्यासह महाराष्ट्र लॉकडाऊन झाला. पण, रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. उलट, ती वेगाने वाढत आहे. 

"बेस्ट' आणि "वस्ट सिनॅरियो' या प्रारुपाच्या आधारावर सर्वोत्तम (बेस्ट) आणि सर्वांत वाईट (वस्ट) अशा दोन प्रकारात वर्गवारी करण्यात आली आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे सर्वोत्तम म्हणजे कमीत कमी किती रुग्णांचे राज्यात आणि पुण्यात निदान होईल, याची अंदाज या सांख्यिकी प्रारुपाच्या माध्यमातून वर्तविण्यात आला आहे. 

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

राज्यात रुग्णसंख्या जाणार चार लाखांवर 
राज्यात पुढील 68 दिवसांमध्ये म्हणजे 15 जूनपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चार लाख 90 हजार होण्याची शक्‍यता "एसईआयआर' प्रारुपाच्या आधारावर वर्तविण्यात आली आहे. त्यापैकी 5 टक्के रुग्णांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार आहे. त्या रुग्णांची संख्या सुमारे 80 हजार असेल. तर, अतिदक्षता विभागाची गरज नसणाऱ्या पण, उपचारांसाठी रुग्णालयातच भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दोन लाख 45 हजार असेल, असेही यात नमूद केले आहे. सध्याचे लॉकडाऊन, संचारबंदी या सर्वांचा विचार केला तरीही राज्याच्या दृष्टीने पुढील दोन महिने आव्हानात्मक असल्याचे यातून अधोरेखित केले आहे. 

Coronavirus : पुणे जिल्ह्यातील 'ही'; २० तपासणी केंद्रे सुरू राहणार २४x७!

पुण्यात दोन हजार रूग्ण असतील "आयसीयू' त 
पुण्यातील पेठा सील केल्या जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. पुण्यात "बेस्ट केस'नुसार 15 जूनपर्यंत रुग्णांची संख्या 40 हजारपर्यंत वाढेल. त्यात दोन हजार रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार असल्याचा अंदाज असून, सहा हजार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागेल, असेही यात स्पष्ट केले आहे. 

"आर-नॉट' कमी करण्याचे आव्हान 
साथीच्या रोगाचा उद्रेक मोजण्यासाठी "आर-नॉट' या पद्धतीचा वापर केला जातो. लॉकडाऊन केले नाही किंवा घरातून बाहेर पडण्याचे आवाहन जुमानले नाही तर एक रुग्ण महिन्याभरात किती रुग्णांपर्यंत विषाणूंचा फैलाव करू शकतो, हे "आर-नॉट'वरून मोजले जाते. महाराष्ट्रात आणि पुण्यात सध्या "आर-नॉट' 1.8 ते 2.5 दरम्यान असल्याचे या अहवाल सांगण्यात आले आहे. या आधारावर राज्यात एक रूग्ण 465 जणांना कोरोनाचा संसर्ग महिनाभरात बाधित करू शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर आणि घरात बसून हे प्रमाण कमी केल्यास नजीकच्या भविष्यात होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण निश्‍चित कमी होईल, असा विश्‍वासही साथरोग तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients in Pune will reach 40 thousand