coronavirus : पुण्यात जंतुनाशकांचा तुटवडा;पुरवठा कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोनाचा उद्रेक सुरू असतानाच निर्जंतुकीकरणासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या जंतुनाशकांचा पुण्यात अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे.

पुणे - कोरोनाचा उद्रेक सुरू असतानाच निर्जंतुकीकरणासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या जंतुनाशकांचा पुण्यात अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात वणवण फिरवूनही जंतुनाशकाची एकही बाटली मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. तर पुरवठा कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सुरुवातीला मास्क, सॅनिटायजर आणि हॅंडग्लोजची मागणी प्रचंड वाढली होती. त्या पाठोपाठ आता डेटॉलसारख्या जंतुनाशकाची मागणी वाढल्याची माहिती बाजारपेठेतून मिळत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जंतुनाशक औषधांची मागणी नोंदविली आहे. पण, त्याचा पुरवठा विस्कळित झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता दुकानात विक्रीसाठी जंतुनाशक उपलब्ध नाही, अशी माहिती औषध विक्रेत्यांनी दिली. कोरोनाच्या उद्रेकामुळे ग्राहकांकडून वारंवार जंतुनाशकाची विचारणा होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. 

Coronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडेही (एफडीए) तक्रारी आल्या आहेत. एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील म्हणाले, ""जंतुनाशकांच्या पुण्यातील डेपोशी संपर्क साधला आहे. त्याच्यावरील छापील किमतीच्या संदर्भातील काही मुद्दे असल्याने बाजारातील पुरवठा थांबला होता. मात्र, त्यातून मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे जंतुनाशकांचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल.'' याबाबत केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टचे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ""जंतुनाशक आणि लिक्विड सोप याचा तुटवडा आहे. ग्राहक याची खरेदी करण्यासाठी औषध दुकानांमध्ये येतो. त्यामुळे वितरकांनी औषध दुकानांमध्ये प्राधान्याने या वस्तू उपलब्ध करून द्याव्यात.'' 

हेही वाचा : पुण्यात फरासखाना, खडक, स्वारगेट व कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी

यासाठी वापरले जाते जंतुनाशक 
- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जंतुनाशक वापरण्यावर भर 
- घरातील फरशी पुसण्यापासून ते सोसायटीची लिफ्ट पुसण्यापर्यंत वापर 
- धुण्याचे कपडे जंतुनाशकाच्या पाण्यात भिजवण्याकडे वाढलेला कल 
- प्रत्येक वस्तू निर्जंतुक करण्यासाठी वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Pesticide shortage in Pune