coronavirus: रक्तदान करा, पण, दक्षता घेऊन... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

इच्छूक रक्तदात्यांनी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी पुरेशी दक्षता घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे. 

पिंपरी - शहरातील बहुतेक सर्व रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने सध्या रक्ताचा तुटवडा भासणे कमी झाले आहे. मात्र, इच्छूक रक्तदात्यांनी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी पुरेशी दक्षता घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरवर्षी, उन्हाळ्यात मुख्यत्वे एप्रिल आणि मे महिन्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो. या काळात, अनेक प्रकारच्या परीक्षा चालू असतात. तसेच बहुतेक जण बाहेरगावी जाणे पसंत करतात. त्यामुळे, गरजू रुग्णांना रक्ताची नेहमी गरज भासत असते. 

Corona Virus : कोरोना आपत्ती निवारणासाठी राजपत्रित अधिकार्‍यांकडून दोन दिवसाचे वेतन

सध्याच्या कोरोनाचा संसर्गाच्या धुक्यामुळे बहुतेक रूग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे, रक्ताचा तितकासा तुटवडा निर्माण झालेला नाही. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी पुढाकार घेण्यास सुरूवात केली आहे. 

यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी शंकर मोसलगे म्हणाले, "सध्याचा रक्तसाठा संपत आला होता. परंतु, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने फारसा तुटवडाही भासत नाही. तातडीच्या शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, डायलिसिस, प्रसूती शस्त्रक्रिया यामध्ये रक्ताची आवश्यकता भासत आहे. मात्र, अनेक समाजसेवी संस्था रक्तदानासाठी पुढे येत आहेत. परंतु, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुरेशी दक्षता घेणे आवश्यक आहे "

अशी घ्या काळजी
- मागील महिन्याभरात रक्तदाता विदेशातून आला नसावा. 
- विदेशातून आलेले कुटुंबातील सदस्य किंवा सहकारी यांच्या संपर्कात रक्तदाता नसावा. 
- रक्तदात्याला सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे नकोत. 
- रक्त पिढीच्या गरजे नुसार रक्तदान शिबिरे घ्या. 
- रक्तदान शिबिराच्या वेळेस हँड सॅनिटाइजर चा वापर केला जावा. 
- रक्तपेढीचे कर्मचारी सुरक्षित साधने उपयोगात आणतील याकडे लक्ष द्या. 
-  ५ पेक्षा जास्त समूहाने रक्तदान करू नका. 
- रक्तपेढीशी संपर्क साधून रूग्णालयात किंवा सोसायटी च्या आवारात रक्तदान घ्या. 
- दोन रक्तदात्यांमध्ये किमान १ मीटरचे अंतर ठेवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donate blood but take care