दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; अतिरिक्त तीन लाख लिटर दूध सरकार खरेदी करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

पुणे जिल्ह्यात दररोज सुमारे तीन लाख लिटर दूध अतिरिक्त होऊ लागले आहे. हे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे - कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक नुकसान  दूध उत्पादक शेतकऱ्यांचे होऊ लागले आहे. यामुळे दूधाच्या मागणीत घट झाल्याने, पुणे जिल्ह्यात दररोज सुमारे तीन लाख लिटर दूध अतिरिक्त होऊ लागले आहे. हे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.          

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला किमान हमी भाव मिळणार असल्याचे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष विष्णू हिंगे आणि कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले.      

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटर २५ रुपयांचा हमी भाव निश्र्चित करून दिला आहे. यानुसार सर्वच खासगी व सहकारी दूध उत्पादक संघांनी हा भाव देणे अनिवार्य आहे. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत निम्म्याने घट झाली. शिवाय दुधाच्या उपपदार्थांच्या मागणीतही घट झाली. परिणामी सहकारी दूध संघांनी तोटा टाळण्यासाठी बाजारातील मागणीनुसार हवे तेवढेच दूध खरेदी करण्यास सुरुवात केली. परिणामी जिल्ह्यात दूध अतिरिक्त होऊ लागले. याचा लाभ घेण्यासाठी खासगी दूध संघांनी प्रति लिटर १७ ते २० रुपायांनी दूध खरेदी सुरू केली होती. यामुळे सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले होते.          

Coronavirus : निजामुद्दीनहून आलेले पिंपरी-चिंचवडमधील 14 जण रुग्णालयात दाखल

दरम्यान, शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना किमान हमी भाव मिळावा, यासाठी सहकारी दूध संघाचे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी (ता.३१) राज्य सरकारने घेतला. यानुसार पुणे जिल्ह्यात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), बारामती तालुका दूध संघ आणि इंदापूर तालुका दूध संघ असे तीन सहकारी दूध संघ आहेत. यापैकी इंदापूर तालुका दूध संघाची दूध खरेदी बंद आहे. उर्वरित दोन दूध संघाचे प्रत्येकी दीड लाखांप्रमाणे तीन लाख लिटर दूध अतिरिक्त होऊ लागले आहे.                      

मनातला कोरोना :  हवा स्वतःच्या दृष्टिकोनावर आढळ विश्वास

राज्य सरकार हे अतिरिक्त दूध खरेदी करून त्याचे दूध पावडर बनविण्यासाठी महानंदला देणार आहे. शेतकऱ्यांना दूधाचे पेमेंट देण्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय
राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता बेभाव दूध विकावे लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दूधाला किमान हमी भाव मिळेल. परिणामी शेतकरी जगू शकेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government decision to buy an additional three lac liters of milk