कोरोनाविरुद्धचे ६० टक्के युद्ध आपण जिंकले; 'आयजेएमआर'चा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

ठळक मुद्दे

  • अध्ययन करताना किमान संक्रमण दर १.५ टक्के तर कमाल ४.९ टक्के इतका गृहीत धरण्यात आला होता. (संक्रमण दर : एका रुग्णाकडून किती जणांना संक्रमण होते.)
  • विमानतळावर ४६ टक्के बाधित रुग्ण, लक्षणे न दिसल्यामुळे सुटल्याची शक्यता. म्हणून सरकारने १५ जानेवारीपासून  आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची तपासणी केली.
  • एकूण रुग्णांच्या अडीच टक्के रुग्णांना वैद्यकीय अतिदक्षतेची गरज भासेल.
  • सगळ्यात भयंकर स्थिती 'डायमंड प्रिन्सेस' या प्रवासी जहाजावर आहे. येथे २६ टक्के लोकांना बाधा झाली असून, ४५० पैकी एक जण मृत्युमुखी पडला आहे.
  • मोबाईलच्या वापरातून संशयितांवर नजर ठेवता येईल, तसेच लक्षणांची मॉनिटरिंग शक्य आहे.
  • वैद्यकीय सुविधांपेक्षाही वैयक्तिक काळजी आणि विलगीकरण सर्वात महत्वाची भूमिका बजावतील.
  • शक्य तेवढ्या लोकांना वैद्यकीय उपचारांचे प्रशिक्षण देणे.

अहवालाच्या मर्यादा

  • हे केवळ संख्याशास्रवर आधारित विश्लेषण आहे. बदलत्या संख्येवर अहवालातील सांख्यकी निष्कर्षात बदल होऊ शकतो.
  • व्यक्तीचा आजारी असण्याचा कालावधी, त्याची प्रतिकारशक्ती यांचा विचार यात नाही.
  • केवळ महानगराच्या लोकसंख्येच्या आणि घनतेचा विचार अहवालात करण्यात आला आहे.

पुणे - आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करून आणि संपूर्ण देश लॉकडाउन करून आपण कोरोनाविरुद्धचे ६० टक्के युद्ध जिंकले आहे. आता गरज आहे ती घरगुती विलागिकरणाची, असा निष्कर्ष 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' या शोधपत्रिकेत नमूद करण्यात आला आहे.

मोदींची जाहीर केलेल्या पीएम केअर्सला करू शकता मदत; वाचा कोणाची किती मदत

चीनमधून संपूर्ण जगात पसरलेल्या 'कोविड-१९' अर्थात कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या संख्याशास्त्राचा अभ्यास या शोधपत्रिकेत करण्यात आला आहे. जगभरात विमानप्रवासाद्वारे कोरोनाचा प्रसार झाला. त्यामुळे दिल्ली, मुंबई, कोलकता, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद आणि कोची या प्रमुख विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येचा इतर देशातील संख्येशी तुलनात्मक अध्ययन करून अहवालात काही निरीक्षणे मांडण्यात आली आहे. त्यानुसार वेळीच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची केलेली तपासणी, संशयितांचे केलेले विलगीकरण आणि धोका लक्षात घेता थांबविलेली उड्डाणे यामुळे बाहेरून आलेल्या बाधितांच्या संख्येवर ६२ टक्के नियंत्रण मिळविल्याचे अहवालात म्हटले आहे. 

गुड न्यूज : राज्यातील २६ ‘कोरोना’रुग्ण बरे होऊन घरी; सध्या कोठे किती रुग्ण?

तसेच, प्रवाशांना विलगीकरणात राहण्याच्या दिलेल्या सूचना यामुळे सामाजिक संक्रमण आपल्याला रोखता आले आहे. संक्रमणच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ आरोग्य यंत्रणेवर अवलंबून राहणे धोक्याचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. नागरिकांनी वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर घेतलेली दक्षता संक्रमण रोखू शकते. नागरिकांना अहवाल दिलासा देणारा असला तरी पुढील कालावधी जास्त जबाबदारीचा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IJMR reports We won 60 percent of the war against Corona