Coronavirus : नोकरीबाबत आयटीयन्समध्ये धाकधूक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

...तर होणार प्रकल्प स्थगित
परदेशी कंपन्यांच्या धोरणात बदल झाल्यास सुरू असलेल्या प्रकल्पाची किंमत व भविष्यातील करारावर केलेले प्रकल्प स्थगित होऊ शकतात. तसेच, प्रकल्पातील अटी-शर्तींमध्येही बदल होण्याची दाट शक्‍यता असल्याचे आयटीयन्सनी सांगितले.

Coronavirus पगार, कर्मचारी कपातीची चर्चा; परदेशातील लॉकडाउनकडे लागल्या नजरा
पिंपरी - सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आयटीयन्स पुढे वेगळेच संकट घोंगावत आहे. हिंजवडीतील बड्या आयटी कंपन्यांना युरोप व अमेरिकासारख्या परदेशातील कंपन्यांकडून मोठे प्रकल्प मिळतात. मात्र, भविष्यात आर्थिक मंदी उद्भवल्यास नवीन प्रकल्प देशात आऊटसोर्स होणार, की नाहीत याची धास्ती आयटीयन्सला लागून आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंजवडी व तळवडे येथील आयटी कंपन्यांमध्ये तीन लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. या सगळ्यांच्या डोक्यावर नोकरीची टांगती तलवार आहे. हातातील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काम मिळेल की नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे. सगळ्यात जास्त पॅकेज असणाऱ्यांना या कपातीला प्रथम सामोरे जावे लागेल. लॉकडाउनचे कारण पुढे करून मोठ्या कंपन्या हातात नोटिसा सोपवतील की काय, याचे संकट त्यांच्यापुढे उभे आहे. 

आयटी कंपन्यांचे परदेशी कंपन्यांसोबत पाच ते दहा वर्षांचे करार असतात. ते संपुष्टात आणल्यास वरिष्ठपासून ते कनिष्ठ पदापर्यंतच्या अनेक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमावण्याची भीती आहे. सध्या सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यास आयटीयन्सना अडचणी येत आहेत. शिवाय प्रकल्पांच्या कालावधीतही कपात होऊ शकते. बेरोजगारी वाढल्यास अमेरिकेकडून भारतीय नोकरदारांना दिला जाणारा एच-१ बी व्हिसादेखील नाकारला जाऊ शकतो. 

लॉकडाउनमुळे कामाला गती नसल्याने काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना रजा घेण्याची सक्ती केली जात आहे. कर्मचारी कपातीची टांगती तलवार असल्याने बेरोजगारी वाढण्याची भीती आहे. आयटी कंपन्यांची करोडो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे लॉकडाउननंतरही मनुष्यबळ कपातीचे चुकीचे निर्णय घेऊ नयेत. 
- पवनजीत माने, अध्यक्ष, फाईट आयटी असोसिएशन, हिंजवडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Itians Tension by Job