Coronavirus : कोरोनासमवेत जगायला शिकायला हवे - श्रावण हर्डीकर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

कोरोना पूर्णपणे जाणार नाही. तसेच आपल्याकडे सध्या त्याविरुद्ध कोणतीही लस नाही. आपण त्याच्या प्रसाराचा वेग कमी करू शकतो. त्यामुळे कोरोनासमवेत जगायला शिकायला हवे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी - कोरोना पूर्णपणे जाणार नाही. तसेच आपल्याकडे सध्या त्याविरुद्ध कोणतीही लस नाही. आपण त्याच्या प्रसाराचा वेग कमी करू शकतो. त्यामुळे कोरोनासमवेत जगायला शिकायला हवे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग फेडरेशनच्या वतीने नुकताच वेबिनार घेण्यात आला. यामध्ये आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी सहभागी झाले होते. त्यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते. यावेळी फेडरेशनच्या वतीने विविध प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. त्याला प्रशासनाच्या वतीने आयुक्त हर्डीकर यांनी उत्तरे दिली. 

हर्डीकर म्हणाले, 'शहरात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर परदेशातून आलेल्या प्रत्येकाचे कडकपणे होम क्‍वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे कोरोनाची शहरात वाढ रोखणे शक्‍य झाले. याबाबत नागरिकांनीही परदेशातून आलेल्या व्यक्तींबाबत महापालिकेला माहिती दिली. मात्र 31 मार्चनंतर बाह्य कारणांमुळे शहरातील रुग्णांची संख्या वाढण्यास सुरवात झाली. कोरोनाची कोणतीच लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा विषाणू जास्त धोकादायक आहे. यासाठी वयाची 60 वर्षे पूर्ण झालेले नागरिक, प्रतिकारशक्ती कमी असलेले नागरिक, गरोदर महिला, लहान मुले यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. चांगले आरोग्य असलेल्यांवर या विषाणूचा परिणाम जाणवत नाही. मात्र अशा व्यक्ती विषाणूच्या वाहक असू शकतात. कोरोनाचे अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी तसेच महापालिकेचे कर भरण्यासाठी महापालिकेने तयार केलेले पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप वापरावे.'' 

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'भाजी मंडईंमध्ये गर्दी आहे. त्यामुळे तेथे ये-जा करणाऱ्यांसाठी एकापेक्षा जास्त गेट असावीत. लॉकडाऊननंतर भंगाराच्या बेकायदा दुकानांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल. भोसरी परिसरात रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करायला हवी. अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. चिखली, कुदळवाडी, मोशी परिसरात नागरिक रस्त्यांवर फिरत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी.'' 

कोरोनाला रोखण्यासाठी .... 
* सोसायट्यांनी जिने, रेलिंग्ज, लिफ्टचा दरवाजा, बटणे या ठिकाणी औषध फवारावे. 
* तातडीच्या प्रसंगी 108 क्रमांक फिरवा. 
* महापालिकेच्या वतीने आठ हजार रुग्णांवर उपचार करण्याची सोय 
* 150 अतिदक्षता बेडची सुविधा 
* नागरिकांना तातडीच्या प्रसंगी पास मिळण्यासाठी सिंगल विंडो सिस्टिम सुरू करणार 
* फेडरेशनचे सरचिटणीस संजीवन सांगळे यांनी प्रास्ताविक केले. सचिन हिवाळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Must learn to live with Corona shravan hardikar