पोलिसांकडून वर्दीचा गैरवापर; सामान्यांनाच लाठीकाठीचा दिला जातो प्रसाद

police
police
Updated on

पुणे - चैत्र पाडवा म्हणजे नववर्षाचा, नवचैतन्य आणि उत्साहाचा दिवस मानला जातो. नवा उत्साह आणि त्यातच नवी खरेदी ही प्रत्येकासाठी अनमोल भेटच असते. विजयाची गुढी उभारू आणि नव्या वर्षाची चांगली सुरुवात करू, असा संदेश प्रत्येकाकडून दिला जातो. मात्र, या वर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गाने सर्वांच्याच आनंदावर विरजन टाकले आणि प्रत्येकाला घरामध्ये कोंडून ठेवले आहे. निरोगी आरोग्यासाठी दारोदारी कडूलिंबाचा डहाळा, साखरगाठी, नवी साडी आणि त्यावर तांब्या-पितळी भांडे अशी गुढी उभारली. निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने प्रार्थना केली.

पोलिसांकडून ठिकठिकाणी अडवून जनसामान्यांना अडवून वेठीस धरले जात आहे, त्याचबरोबर लाठीकाठीचा प्रसादही दिला जात आहे. गरजवंतही त्यांना ओळखता येत नाही, परिस्थिती समजून घेत नाहीत, अशी स्थिती सध्या तरी पोलिसांबाबत दिसत आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी (दि. 24 मार्च) रात्री 8 वाजता आणखी 21 दिवस देशभर संचारबंदी जाहीर केली आहे. त्यातून हॉस्पिटल, अन्नधान्यासह बऱ्याच गोष्टी वगळल्या असल्या तरी पोलिसांनी सर्वसामान्यांना चांगलेच वेठीस धरले आहे. कुटुंबीयांना उपचारासाठी घेऊन जात असतानासुद्धा बाजूला घेऊन त्याला काठीने मारहाण करीत वाहनाची चावी फेकून देण्यासारखा मस्तवालपणा सुरू केला आहे.

गस्तीवरील पोलीस तर दारातही नागरिकांना थांबू देत नाहीत. गच्ची आणि दारात थांबले तरी पोलीस दमदाटी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेऐवजी खाकी वर्दीकडून गैरसोय केली जात नाही का, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गॅस संपला, भाजीपाला, दूध, औषधे, किराणा माल आणण्यासाठी कुटुंबातील एकच व्यक्ती जात आहे. आजारी रुग्णाला घेऊन जाण्यासाठी सहकारी असणे अपेक्षित आहे. लहान बाळ असेल, तर तिघेजण जाणे क्रमप्राप्त आहे, पुरुष मंडळींना पोलिसांकडून मारहाण करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच झाला आहे का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीच आवश्यक गरजा वगळल्या आहेत, तरीसुद्धा पोलिसांकडून वर्दीचा गैरवापर करून अतिरेक केला जात आहे, असे सर्वत्र चित्र दिसत आहे.

मराठी माणसाच्या नव्या वर्षाला ग्रहणच लागले म्हणावे लागेल. मागिल आठवड्याभरापासून कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दोन दिवसांपासून वृत्तपत्र नाहीत आणि पुढील काही दिवस वर्तमानपत्र येणार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली असल्याने अनेकजण अस्वस्थ झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या दाखवल्या जात असल्या तरीसुद्धा वृत्तपत्रात छापून काय आले आहे, यावर तमाम जनतेचा मोठा विश्वास आहे. नागरिकांनी स्वतःहून घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. मात्र, आवश्यक वस्तू आणण्यासाठी त्यांना बाहेर पडावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

पोलिसांची मारहाण जीवावर बेतली

पोलिसांच्या मारहाणीमध्ये एका दुचाकीस्वाराला प्रचंड मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांपासून त्या व्यक्तीला चालता येत नाही, बसता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. जीवावर बेतेल अशा पद्धतीने मारहाण करण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. सोशल मीडियावर पोलिसांच्या मारहाणीचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. चार-पाच पोलीस एक एका दुचाकीचालकाला मारहाण करीत आहेत.  अशा मस्तवाल पोलिसांनाच आता घरी बसवा म्हणण्याची वेळ आली आहे. आता तक्रार तरी कोणाकडे करायची अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.

कोरना नव्हे पोलिसांची भीती

कोरोना व्हायरस संसर्गापेक्षा पोलिसांचा त्रास वाढला आहे. दूचित्रवाणीवरील चित्र पाहून अनेकांनी आजार परवडला, पोलिसांची दंडुकेशाही नको, अशीच प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ, वृद्ध, महिला नागरिकांना अपमानास्पद बोलण्याचा तर कळसच केला आहे. पोलिसांना काही सांगितले, तर म्हणतात तुमच्यासाठीच आम्ही रस्त्यावर थांबलो आहे. तुम्ही घरात बसा आम्ही रस्त्यावर थांबतो. मात्र, औषधे, किराणा, दूध, भाजीपाला या गोष्टी पैसे दिल्याशिवाय मिळत नाहीत. पैसे मिळविण्यासाठी काम करावे लागते, त्याशिवाय कोणी फुकट देत नाही, या गोष्टी कोणीच समजून का घेत नाही. घरात बसून उपाशी राहायचे का, हा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. साठवणूक नाही, मात्र गरजेपुरते तरी मिळावे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, अशी आर्त हाक सामान्यजणांकडून दिली जात आहे.

याला काय म्हणायचे

 पोलीस अधिकारी बातमीदारांनाही म्हणतात घरी बसा की, कशाला फिरता, आम्हाला आमचे काम करू द्या. दस्तुरखुद्द पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनीही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला वगळले आहेत. तरीसुद्धा खादी वर्दीतील जबाबदार व्यक्ती असे म्हणत असेल तर त्याला मस्तवालपणा की माणुसकी म्हणायची असा प्रश्न पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com