अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक कोटीचे सुरक्षाकवच;पुणे महापालिकेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय प्रशासनाने बुधवारी घेतला.

पुणे - कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय प्रशासनाने बुधवारी घेतला. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता. 9) करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षाकवच देण्याचा आग्रह महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांकडे धरला होता. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, रुग्णालयातील सेवक, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, लिपिक, अभियांत्रिकी संवर्गातील सेवक आणि शिक्षकांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे. येत्या 31 जुलैपर्यंत ही योजना सुरू राहील, असे मोहोळ यांनी सांगितले. 

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य विभागातील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी जिवाची पर्वा न करता या रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे आतापर्यंत काही रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, रूग्णांवर उपचार करताना त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका नाकारता येत नाही. यामुळे ही योजना लागू केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

कोरोनाविरोधातील लढाईत अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी ही योजना सरू केले आहे. 
-मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC decision one crore security cover for officers employees