घरात राहूनच सुरक्षित आणि निरोगी गुढीपूजन करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

तुम्हाला घरातील वस्तू वापरून देखील गुढीपूजन करणे शक्‍य आहे. त्यामुळे घरात राहूनच सुरक्षित आणि निरोगी गुढीपूजन करता येणार आहे.

पुणे - गुढीपाडव्याच्या तयारीसाठी घराबाहेर पडून बाजारपेठेत गर्दी करण्याची आता गरज नाही. तुम्हाला घरातील वस्तू वापरून देखील गुढीपूजन करणे शक्‍य आहे. त्यामुळे घरात राहूनच सुरक्षित आणि निरोगी गुढीपूजन करता येणार आहे. 

राज्यात संचारबंदी असतानाही नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळते.घराघरात बुधवारी (ता.25)गुढीपाडवा साजरा करण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली तयारी हे देखील या मागील एक कारण आहे. यंदा "कोरोना'चे सावट असताना मोठ्या थाटा-माटात गुढीपाडवा साजरा करता नाही आला तरी, कमीत कमी गोष्टींचा वापर करून गुढीपूजन करणे शक्‍य आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दाते पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले, "यावर्षी गुढीपूजनाला साखरेची माळ, कडुनिंबाचा पाला मिळाला नाही तरी चालेल. अशा परिस्थितीत पारंपरिक पद्धती ऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र किंवा नवे वस्त्र बांधून गुढीपूजन करावे.कदाचित काही घरात काठी नसेल तर देवापुढे रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढून सुद्धा पूजन करता येईल. हे पूजन करताना नवीन वर्षाचा संकल्प हा "राष्ट्राच्या आणि विश्वाच्या आरोग्यासाठी मी स्वच्छतेचे,शिस्तीचे पालन करेन' असा करता येईल.त्यामुळे गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या किंवा बाजारात जाण्याच्या तयारीत असणाऱ्या नागरिकांनी गुढीपूजनाच्या या पर्यायाचा नक्की विचार करावा, असेही दाते यांनी "सकाळ'शी बोलताना सूचविले आहे. 

हेही वाचा : पुणे विद्यापीठातील केंद्राला 'नॅशनल रिसोर्स सेंटर'चे नामांकन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stay safe and healthy at home and celebrate gudi padwa