#SakalKeepsNewsReal अविरतपणे झटणाऱ्या सर्वांना सलाम!

टीम ई सकाळ
शुक्रवार, 20 मार्च 2020

सर्व कोरोनाग्रस्तांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची काळजी घेणारा विभाग, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्स, पोलिस, स्वच्छता कामगार, तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवणारी माध्यमं, पत्रकार या सगळ्यांचंच कौतुक करावं तितकं थोडं आहे. 

कोरोना व्हायरसने जग व्यापून टाकलेले असतानाच सर्वच देश आपापल्या परीने देशवासियांची काळजी घेण्यात व्यस्त आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार ते अगदी ग्रामपंचायत स्तरावरही प्रशासन उत्तम खबरदारी घेत असून याचा परिणामही दिसून येतोय. देशात साधारण १९५ कोरोनाग्रस्त सापडलेले असताना ४ बळी गेले आहेत. मात्र सर्व कोरोनाग्रस्तांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची काळजी घेणारा विभाग, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्स, पोलिस, स्वच्छता कामगार, तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवणारी माध्यमं, पत्रकार या सगळ्यांचंच कौतुक करावं तितकं थोडं आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो आणि कोरोनाच्या या मुकाबल्यात मीडियाही एका मजबूत स्तंभासारखा अविरतपणे काम करत तुमच्या पर्यंत अचूक, खरी, जास्तीत जास्त व स्थानिक माहिती पोहोचविण्यात व्यस्त आहे. राज्यातील ९० टक्के कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमचा आदेश दिलेला असताना, मात्र 'सकाळ' माध्यमसमूहातील व इतर मीडियामधील आपले पत्रकार मित्र, शहरातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तुम्हाला कोरोनाबाबतची खरी माहिती देत आहे. या सर्वात सगळ्यात सुळसुळाट झालाय तो म्हणजे अफवांचा. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यापासून अफवांचे पिकही तितकंच वाढलंय. मात्र, या सगळ्याला थारा न देता सर्व प्रकारचा मीडिया हा अविरतपणे काम करत तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवत आहे. 

CoronaVirus : वर्क फ्रॉम होम करा सुखकारक

फोटोग्राफर्स आपल्या जीवाची पर्वा न करता ओस पडलेल्या रस्त्यांची परिस्थिती तुम्हाला सांगत आहेत. संपादक-उपसंपादक, ऑनलाईन टीम, सोशल मीडिया टीम प्रत्येकजण ऑफिसमध्ये येऊन कोरोनाबाबत गैरसमज पसरू नये यासाठी योग्य ती माहिती सोपी करून देत वाचकांना समजावून देत आहेत. स्थानिक माहिती जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सगळीच माध्यमं अविरत झटत आहेत.

राज्यात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. अशातच डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहे, सर्व कोरोनाग्रस्तांना आणखी त्रास होणार नाही ना याकडे नर्स लक्ष देत आहेत, शहरातील मेडिकल दुकाने २४*७ सेवा देण्यात व्यस्त आहेत. आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन यांनी उत्तम प्रकारे मॅनेजमेंट करत कोरोनाला अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Coronavirus : भारतात आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू; बाधितांची संख्या...

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांची आई आयसीयूमध्ये असून देखील ते कोरोनाबाबत सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली. तसेच काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याऱ्या सर्वांचे कौतुक केले. यात त्यांनी डॉक्टर, नर्स, पोलिस, मीडिया, प्रशासन या सर्वांचाच नामोल्लेख केला व त्यांच्या कृतज्ञतेसाठी रविवारी (ता. २२) संध्याकाळी पाच वाजता खिडकीत, गॅलरीत येऊन टाळ्या वाजवून कौतुक व आभार मानण्याचे आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emergency services continue on work in bad situation of Corona