आधी विकेट मिळव; मग विराटवर टीका कर- इंझमाम

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

कराची : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या क्षमतेवर शंका घेण्याअगोदर भारतात प्रथम विकेट मिळव, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि त्यांच्या निवड समितीचा अध्यक्ष इंझमाम उल हकने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनवर टीका केली.

कराची : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या क्षमतेवर शंका घेण्याअगोदर भारतात प्रथम विकेट मिळव, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि त्यांच्या निवड समितीचा अध्यक्ष इंझमाम उल हकने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनवर टीका केली.

मुंबईतील सामन्यात इंग्लिश गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या विराट कोहलीची शानदार फलंदाजी आणि भारताचा दिमाखदार विजय यामुळे सैरभैर झालेला अँडरसनची जीभ घसरली. त्याने थेट विराटच्या तंत्रावर शंका घेतली. यावरून सामन्याच्या अखेरच्या दिवशी तो फलंदाजीस आला, तेव्हा अश्‍विननेच त्याला जाब विचारला होता. त्यामुळे मैदानावर काही वेळ बाचाबाची झाली होती.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम मात्र कोहलीच्या पाठीशी उभा राहत त्याने अँडरसनला सुनावले आहे. आम्ही जर इंग्लंडमध्ये धावा केल्या, तर तुम्ही आम्हाला तंत्रशुद्ध फलंदाजीचे प्रमाणपत्र देऊ, असे अँडरसनचे म्हणणे आहे का? जेव्हा इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उपखंडात अपयशी ठरतात तेव्हा आम्ही तुमचे संघ दुबळे किंवा तुमचे फलंदाज तंत्रहीन आहेत असे कधी म्हटले आहे का? असा सवाल करून इंझमाम म्हणतात, की कसोटी सामन्यात धावा या धावाच असतात, त्या कोठे केल्या याला महत्त्व नसते.

भारतीय क्रिकेटमधील एकापेक्षा एक सरस फलंदाजांविरुद्ध खेळणाऱ्या इंझमाम यांनी विराटला श्रेष्ठ ठरवले आहे. एखादा फलंदाज आपल्या संघाच्या विजयात किती धावा करतो, यावरून मी त्याचे श्रेष्ठत्व ठरवत असतो. एखाद्या फलंदाजाने 150 धावा केल्या; पण त्याचा संघ हरला आणि 80 धावा करून जर एखाद्या फलंदाजाने संघाला विजय मिळवून दिला, तर माझ्यासाठी 80 धावा करणारा फलंदाज श्रेष्ठ असतो, असे इंझमाम यांनी सांगितले.

सेहवागची सर्वांत जास्त भीती
पाकिस्तानचा कर्णधार असताना मला वीरेंद्र सेहवागची सर्वांत जास्त भीती वाटायची. तो धोकादायक फलंदाज होता. एकदिवसीय सामन्यात त्याने 80 धावा केल्या, तर भारतात निश्‍चितच 300 च्या पलीकडे मजल मारायचा. सेहवाग जेवढा जास्त वेळ मैदानावर राहायचा तेवढा तो आमच्या गोलंदाजांचे मनोधैर्य खच्ची करायचा, असे इंझमाम यांनी मनमोकळेपणे सांगितले.

Web Title: inzamam hails virat kohli against anderson