सायलेंट स्प्रिंग आणि पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व

मानवी इतिहासाच्या वैज्ञानिक क्रांतीच्या टप्प्यावर दुसऱ्या महायुद्धादरम्यान अनेक शास्त्रे व तंत्रज्ञाने विकसित झाली.
Silent Spring
Silent SpringBook

- अंजली जोशी, अमेरिका

रॅचेल कार्सन यांनी कीटकनाशकांच्या परिणामांसंबंधी अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या. निसर्गाचा अविभाज्य भाग असणाऱ्या मानवाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गावरच कब्जा करणे हा माणसाचा उद्धटपणा आहे, या विचारांनी त्या अस्वस्थ झाल्या. सलग ४ वर्षे सप्रयोग अभ्यास करून त्यांनी १९६२मध्ये ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकात जगातला पर्यावरणाचा पहिला-वाहिला शास्त्रीय विचार मांडला...

मानवी इतिहासाच्या वैज्ञानिक क्रांतीच्या टप्प्यावर दुसऱ्या महायुद्धादरम्यान अनेक शास्त्रे व तंत्रज्ञाने विकसित झाली. डीडीटी Dichloro diphenyl trichloro ethane ह्या विषारी कीटकनाशकाचा शोध याच काळातला. ‘डीडीटी’ने त्याकाळात संपूर्ण जगभर टायफॉईड, मलेरिया आणि कीटकांमार्फत पसरणाऱ्या इतर रोगांपासून असंख्य लोकांचे जीव वाचवले. महायुद्धानंतर अमेरिकेने या कृत्रिम रसायनांचा उपयोग शेती उत्पादन वाढवण्यासाठी केला. स्वच्छतेसाठी व कीटक नियंत्रणासाठी सगळीकडे ही रसायने वापरली जाऊ लागली. शेतीमध्ये वाढणारे तण आणि उच्छाद आणणारे कीटक यांच्या विरोधात सरकारने आकाशातून ‘डीडीटी’सारख्या कीटक नाशकांच्या फवारणीची अनेक अभियाने अमलात आणली. रसायनांच्या उद्योगांना सवलती मिळाल्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. त्यांचा भरपूर वापर व्हावा म्हणून कायदे व नियमावल्या तयार झाल्या. कुठल्याही प्रकारचा पूर्वाभ्यास, पद्धतशीर नियोजन यांच्या अभावामुळे आणि दृश्‍य आणि अदृश्‍य परिणामांमुळे या अनिर्बंध अभियानांना लोकांचा प्रतिसाद थंडच होता.

कीटकनाशकांचे दुष्परिणाम

सागरी जीवशास्त्रज्ञ असणाऱ्या रँचेल कार्सन यांनी या परिणामांसंबंधी अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या. निसर्गाचा अविभाज्य भाग असणाऱ्या मानवाने प्रगतीच्या नावाखाली निसर्गावरच कब्जा करणे हा माणसाचा उद्धटपणा आहे, या विचारांनी त्या अस्वस्थ झाल्या. सलग ४ वर्षे सप्रयोग अभ्यास करून त्यांनी १९६२मध्ये ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकात जगातला पर्यावरणाचा पहिला-वहिला शास्त्रीय विचार मांडला. आजच्या पर्यावरण चळवळीची बीजे येथे रुजली. सरकारच्या अनिर्बंध फवारणी कार्यक्रमांचा आढावा कार्सन बाईंनी घेतला. या रसायनांमधील किरणोत्सर्गी घटक मातीतून, बियाण्यांमधून, पिकांमधून संपूर्ण अन्नसाखळी पार करून सजीवांच्या (पक्षी, प्राणी, जलचर, पिके आणि अर्थातच माणसाच्या) जनुकांपर्यंत पोचतात, गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सजीवांवर परिणाम करतात; सजीवांच्या चरबीमध्ये साठून राहिलेली ही रसायने ठरावीक काळाने त्यांचा परिणाम दाखवतात. ती सजीवाच्या आईकडून अनुवंशिकतेच्या माध्यमाने पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतात, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.

सरसकट सगळीकडे रसायनांची फवारणी करण्याने सुरुवातीला कीटकांचा उपद्रव कमी होतो; पण लवकरच कीटक रसायनांना प्रतिक्षम होऊन दुप्पट वेगाने व तीव्रतेने त्यांचे पुनरुत्पादन होते व मग आपल्याला अधिक क्षमतेची रसायने तयार करावी लागतात. या अव्याहत चक्रामुळे पर्यावरणाचा समतोल ढळतो. तोपर्यंत असा सर्वांगीण विचार जगापुढे आला नव्हता, त्यामुळे हे विचार पचायला अवघड होते. त्यांच्या निंदकांनी त्यांच्यावर व पुस्तकावर प्रचंड टीका केली. रसायन उद्योगाने कार्सन बाईंना कम्युनिस्ट हस्तक ठरवले, इतकेच काय त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडेही उडवले. शेवटी कॅन्सरशी लढा देणाऱ्या बाईंना काँग्रेसच्या सुनावणीला कोर्टात हजर राहावे लागले. त्यांच्या समर्थक शास्त्रज्ञांनी मात्र त्यांना चांगली साथ दिली.

कायदा पर्यावरणाचा

कीडनाशकांवर बंदी घालावी, असे कार्सन बाईंनी म्हटलेले नाही. त्यांचा विरोध होता तो रसायनांच्या बेबंद व बेदरकार वापराला! रसायनांच्या घटकांची व परिणामांची पूर्ण माहिती ग्राहकांना देणे हे उत्पादकांना बंधनकारक असावे, असे त्यांनी मांडले. कृत्रिम रसायनांना अनेक जैविक पर्याय सुचवले. आजच्या पर्यावरणीय असमतोलास कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये ६०च्या दशकात निर्माण झालेल्या कृत्रिम रसायनांचा सहभाग फार मोठा आहे. अमेरिकन राज्यकर्त्यांनी मात्र पुस्तकाची दाखल घेतली. पुढे १९६४मध्ये अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी त्यांच्या अनेक शिफारशी अमलात आणल्या. पर्यावरणाचा कायदा केला व त्याची अंमलबजावणी करणाऱ्या ‘EPA’ची स्थापना केली.

दररोज भूमितीय श्रेणीने वाढत असलेल्या व अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण करणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय करण्याची वेळ निघून जात आहे. सहाव्यांदा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जगाला आज कोरोना विषाणूने हतबल करून टाकले असताना, हे पुस्तक आज ६० वर्षांनीसुद्धा अप्रस्तुत किंवा अप्रासंगिक आहे, असे म्हणायचे धाडस कोणी करणार नाही, असे वाटते.

घडामोडी

  • मानवी प्रगतीच्या इतिहासात ७० हजार वर्षांपूर्वी बौद्धिक क्रांती झाली. त्यानंतर आर्थिक वा कृषी क्रांती (१६०० -१७५०); औद्योगिक क्रांती १७८०-१८४०; तंत्रज्ञान क्रांती १८७०-१९२०; वैज्ञानिक क्रांती१९४०-१९७०; व डिजिटल क्रांती १९७५-२०२१ या टप्प्यांनी आपण आज इथे पोचलो आहोत.

  • १९३९मध्ये पॉल म्युलर यांनी डीडीटीचा शोध लावला

  • जागतिक इतिहासकार युवल नोवा हरारी म्हणतात, पर्यावरणाचा समतोल ढळू लागला, की पर्यावरणीय संकट व त्यामुळे आर्थिक संकट जे पर्यायाने राजकीय व सामाजिक संकट घेऊन येते. त्यामुळे मानवी संस्कृतीचा ऱ्हास होऊ शकतो. हा समतोल सांभाळणे फक्त माणसाच्याच हातात आहे. पण आपल्याला मात्र या बौद्धिक शक्तीबरोबर येणाऱ्या जबाबदारीचा विसर पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com