Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी साठी पंढरी झाली सज्ज..

आषाढी यात्रेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागासह कर्नाटक व तेलंगणा मधून भाविकांचे पंढरीत आगमन होत आहे
Ashadi Ekadashi
Ashadi EkadashiSakal

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागासह कर्नाटक व तेलंगणा मधून भाविकांचे पंढरीत आगमन होत आहे. नवमीच्या दिवशी मंगळवारी (ता.२७) सुमारे अडीच लाखाहून अधिक भाविक विठ्ठल नगरीमध्ये दाखल झाले होते.

दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली असून श्रींच्या दर्शनासाठी पंधरा ते सतरा तासांचा अवधी लागत आहे.

आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी निघालेल्या सर्व मानाच्या पालख्यांचे मंगळवारी पंढरपूर समीप असलेल्या वाखरी पालखीतळावर आगमन झाले आहे. पालख्या समवेत असलेल्या दिंडीतील बहुतांश वारकरी आपापल्या मठामध्ये दाखल झाले आहेत.

याशिवाय रेल्वे, एसटी व आपल्या खासगी वाहनातून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरपूर मधील गर्दी वाढली आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, भक्ती सागर (६५ एकर), प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, पत्रा शेड दर्शन रांग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

Ashadi Ekadashi
Ashadi Ekadashi 2023:आषाढी एकादशीला घ्या 'या' खास पदार्थांचा आस्वाद..

पंढरीतील सर्व मठ, लॉजेस, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास हाउसफुल झाले आहे. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली आहे. दर्शनाच्या रांगेतील भाविकांना आज मंदिर समितीच्या वतीने तांदळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.

आज नवमी दिवशी श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले भाविक शंकर आबाशेठ तंगे (रा.हसनाबाद,जि.जालना) 'सकाळ ' शी संवाद साधताना म्हणाले, आम्ही सोमवारी सायंकाळी सहा वाजता दहा नंबरच्या पत्रा शेडमधील दर्शन रांगेत उभे होतो.

Ashadi Ekadashi
Ashadhi Vari 2023 :वारी कधी आणि कुठे सुरु झाली? एका क्लिकवर जाणुन घ्या

जवळपास सतरा तासानंतर मंगळवारी सकाळी अकरा वाजता आम्हाला श्री विठ्ठलाचे पददर्शन प्राप्त झाले. दर्शन रांगेत काही प्रमाणात घुसखोरी होत असल्याने दर्शनासाठी वेळ लागत आहे. प्रशासनाने दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करावी. श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी दीड ते दोन तास लागत आहेत.

Ashadi Ekadashi
Ashadi Wari 2023 : पंढरीच्या वारीची परदेशी वारकऱ्यांना भुरळ

श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतलेले वयोवृद्ध भाविक शंकर प्रल्हाद येऊल म्हणाले, श्री विठ्ठलाचे पददर्शन घेण्यासाठी तासन् तास दर्शनरांगेमध्ये उभे राहावे लागते. ते या वयात शक्य नाही म्हणून मुखदर्शनावरच समाधान मानावे लागले.

दरम्यान आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी (ता.२८) पंढरीत आगमन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com