Ayodhya Ram Mandir : वैदिक सिटीची योजना ते विकासकामे, भविष्यातील अयोध्या उभी राहताना...

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या मंदिरात श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी होत आहे. तर, दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो' यात्रेचा दुसरा टप्पा (भारत न्याय यात्रा) याच दरम्यान चालू झाली आहे. पाठोपाठ लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.
भविष्यातील अयोध्या उभी राहताना...
भविष्यातील अयोध्या उभी राहताना...Sakal

।। जय श्रीराम ।।

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या मंदिरात श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी होत आहे. तर, दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो' यात्रेचा दुसरा टप्पा (भारत न्याय यात्रा) याच दरम्यान चालू झाली आहे. पाठोपाठ लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.

देशातील राजकारणाचा प्रदीर्घ काळ केंद्रबिंदू राहिलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीबद्दल राजकीय टीकाटिपण्णी चालू आहेच आणि ती होतच राहील. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी आणि मतदारांना वास्तवाची जाणीव व्हावी,

यासाठी भारत संघर्ष यात्रा चालू होत आहे तर, दुसरीकडे गावागावांतून पोचलेल्या शिलांच्या (विटा) बळावर राममंदिर साकारत आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय धार्मिक अस्मिता प्रज्वलित होत असताना, परिसरातील पायाभूत सुविधांमुळे अयोध्येचा कायापालट होत आहे. त्यामुळेच जगाच्या नजरा अयोध्येकडे लागल्या आहेत.

- मंगेश कोळपकर

लखनौवरून अयोध्येत प्रवेश करतानाच रस्त्यावर उभारण्यात येत असलेले रामायणातील प्रसंग सांगणारे म्युरल्स, विमानतळ आणि रेल्वे स्थानकावरील श्रीरामाची महती सांगणारी छायाचित्रे, भगवे झेंडे.... हे सगळे पाहून अयोध्या आता पुरती श्रीराममय झाल्याचे दिसून येते.

श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात होणार आहे. त्या भोवतालच्या ७० एकर परिसराचा विकासही टप्प्याटप्याने होणार असून, त्यासाठीची विकासकामे आता युद्धपातळीवर सुरू आहेत.

देशाचा मानबिंदू ठरावे, असे जागतिक दर्जाचे वारसास्थळ उभारण्याचा केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचा प्रयत्न आहे. त्यावर राजकीय विरोधकांकडून अयोध्या हे केवळ धार्मिक पर्यटनासाठीचे तीर्थक्षेत्र असे म्हटले जात आहे. राजकीय टीकाटिप्पणीपेक्षा अयोध्या कशी बदलत आहे, याकडे निरपेक्ष भावनेने पाहणे गरजेचे आहे.

श्रीराम मंदिरासाठी सुरू असलेला सुमारे ५०० वर्षांपासूनचा संघर्ष, त्यासाठी झालेली आंदोलने, त्यातून राजकारणावर पडलेला प्रभाव आणि अखेर ९ नोव्हेंबर २०२१ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, या पार्श्‍वभूमीवर अवघ्या २६ महिन्यांत नव्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्रीराम जन्मभूमी न्यासाकडून होत आहे.

श्रीराम मंदिरामुळे एकेकाळी देशाचा कानाकोपरा ढवळून निघाला होता. धार्मिक दंगलीही झाल्या होत्या. त्यातून काही राजकीय नेते उदयाला आले, तर काही अस्ताला गेले. त्यामुळेच आखाती देशांपासून अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील देशांबरोबरच मंदिराकडे जगाचे लक्ष लागले आहे.

राम मंदिराच्या उभारणीचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. म्हणूनच, लोकसहभागातून उभारण्यात येणारे मंदिर भव्य असेल, त्याची छाप जगावर उमटेल, या दृष्टीने श्रीराम जन्मभूमी न्यासाचे प्रयत्न सुरू आहेत.

देशाच्या विविध भागांतून श्रीरामावरील श्रद्धेपोटी भाविकांची रीघ सध्या अयोध्येत लागली आहे. मात्र, केवळ मंदिर उभारून राष्ट्रीय अस्मिता चेतवली जाणार नाही, तर त्यासाठी पूरक आणि पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत,

हे लक्षात घेऊन विकासाचे नवे ‘मॉडेल’ देशापुढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न संघ परिवार करीत आहे. त्यासाठी एखाद्या राजकीय नेतृत्वाला श्रेय देण्याऐवजी समग्र नियोजन त्यासाठी कारणीभूत ठरले, हे याबाबतच्या घडामोडींचा घटनाक्रम पाहिल्यास लक्षात येते.

टप्प्याटप्याने विकासकामे

कोणतेही तीर्थक्षेत्र म्हटले की गर्दी, अस्वच्छता, गोंगाट असे चित्र असते. परंतु, अयोध्या त्याला अपवाद ठरावी, असा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेल्या दिवसापासूनच सुरू झाला. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटले होते.

त्यामुळे केंद्रात सत्ता मिळाल्यावर भाजपची पावले त्यादिशेने पडणार, हे स्वाभाविकच होते. मंदिर उभारणी, हे भाजपचे धोरण आहे, ते साध्य करताना धार्मिक अस्मिता जोपासत अल्पसंख्याकांनाही खुणावेल, अशा विकासाच्या नीतीची अंमलबजावणी होऊ लागली. त्यातून अयोध्येचे चित्र बदलण्याच्या दिशेने पावली पडू लागली.

मुख्य श्रीराम मंदिराचे बांधकाम ३ एकरांत सुरू आहे. त्यात ३७० फूट लांब, २६८ फूट रुंद जमिनीपासून १६१ फूट उंचीचे मंदिर होत आहे. त्यावर १८ फूट उंचीचा कळस असेल. ७० एकरांचा परिसर असला तरी, बांधकाम ३० टक्के भागातच होणार आहे.

त्यात परिसरात एकूण ७ मंदिरे असतील. प्रवेशद्वारावर वृद्ध, दिव्यांग यांच्यासाठी लिफ्ट, दोन रॅम्प असतील. तर, परिक्रमेचा मार्ग १० एकर जागेतून जाणारा असेल. मुख्य मंदिरात तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला असेल.

तळमजला आणि पहिल्या मजल्याचे काम २२ जानेवारीपर्यंत पूर्ण होऊन भाविक विनासायास श्रीरामाचे दर्शन घेऊ शकतील. मंदिरात एकूण ३९४ खांब असतील. त्यातील प्रत्येक खांबावर किमान १२ मूर्ती असतील.

त्यांचा आकार १० ते २२ इंचाचा असेल. एक खांब घडविण्यास किमान १२ दिवस लागतात. त्यावर तीन कारागीर मूर्ती घडवितात. त्यासाठी किमान ८ हजार कारागीर विविध ठिकाणी कार्यरत आहेत. परिसराचा विकास पूर्ण होण्यास किमान ३ वर्षे लागणार आहेत. सध्या सुरू असलेले बांधकाम बघितले तर, मंदिराची व्याप्ती आणि भव्यता लक्षात येते.

भव्य मंदिरासाठी...

मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच श्रीराम जन्मभूमी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा म्हणजेच ‘रामपथ’ही आता लक्षवेधी झाला आहे. या १४ किलोमीटरच्या रस्त्यावर दुकाने, हॉटेल्स, बॅंका, एटीएम आदींचे ले-आउट समान झाले आहेत.

मंदिरात श्रीरामाची प्रतिष्ठापना झाल्यावर अयोध्येत रोज किमान २ लाख भाविक येतील, असे गृहीत धरून नियोजन आणि तयारी करण्यात येत आहे. त्यांचा ताण नगर परिषदेवर पडणार नाही, याची स्थानिक प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.

त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा एक जलशुद्धीकरण प्रकल्प, प्रत्येकी ४०० दशलक्ष घन लिटर (एमएलडी) क्षमतेचे दोन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. १०० ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येत आहेत, तर, २७ ठिकाणी पार्किंगचे लॉट्स तयार करण्याचे काम सुरू आहे.

भविष्यातील अयोध्या उभी राहताना...
Ayodhya Ram Mandir : काळाराम संस्थानच्या ‘आनंद उत्सवा’स सामुहिक ढोल प्रदक्षिणेने प्रारंभ

अयोध्येत वारंवार महत्त्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येतील, हे गृहीत धरून ३ हेलिपॅड उभारण्यात येत आहेत. अयोध्येत येणारा भाविकवर्ग गरीब, श्रीमंत वर्गातील आहे. हे लक्षात घेऊन ४० ठिकाणी अन्नछत्र उभारण्यात येत आहेत.

पुनर्निर्माण झालेल्या अयोध्या धाम रेल्वे जंक्शन आणि नव्याने उभारण्यात आलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळही अयोध्या नगरीला साजेसा करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद यांच्याशी

एअर कनेक्टिव्हिटी झाली आहे. ही संख्या अल्पावधीत वाढणार आहे. तसेच लखनौ, गोरखपूर, वाराणसी आदी भागांतून अयोध्येच्या दिशेने येणाऱ्या महामार्गांचे रुंदीकरणही वेगाने करण्यात येत आहे. तर, अयोध्येभोवतालच्या दोन रिंगरोडचेही काम प्रगतिपथावर आहे. उड्डाण पुलांचेही काम सुरू आहे.

भविष्यातील अयोध्या उभी राहताना...
Ayodhya Ram Mandir : अयोध्या, कश्‍मिरसह पूर्वोत्तरला पर्यटकांची पसंती; भेट देण्याची आज अखेरची संधी

अयोध्या ही मंदिर, मठ आणि साधूंची नगरी म्हणून ओळखली जाते. येथे सुमारे ५ हजार मंदिरे, मठ आहेत. त्यात किमान ४० हजार साधूंचे वास्तव्य आहे. अयोध्येपासून १७ किलोमीटर अंतरावर मुस्लिमबहुल असलेले फैजाबाद हे जुळे शहर आहे.

ब्रिटिश काळापासून फैजाबाद हा प्रांत होता, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो जिल्हा झाला. मात्र, २०१४ मध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले व सुमारे ४ वर्षांपूर्वी त्यांनी या जिल्ह्याचे नामकरण ‘अयोध्या’ केले.

आजही प्रमुख प्रशासकीय कार्यालये फैजाबादमध्येच आहेत. परंतु, पुढच्या काळात अयोध्या विस्तारत जाणार हे लक्षात घेऊन अयोध्येच्या पंचक्रोशीत विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. त्यासाठी तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या विकासयोजना

सुरू झाल्या आहेत. या बदलाचे पडसाद राजकीय क्षेत्रावर उमटणार, हे निश्चितच. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, एकाधिकारशाही हे मुद्दे विरोधकांकडून आता तीव्रतेने पुढे येऊ लागले आहेत. त्यावर राममंदिर हे एकमेव उत्तर नाही, हे स्पष्टच आहे. परंतु, विकासाच्या नव्या ‘मॉडेल’कडे कसे पाहतील, यावरच पुढचे समाजकारण-राजकारण अवलंबून असेल.

भविष्यातील अयोध्या उभी राहताना...
Ayodhya Ram Mandir : देशभरातील संत, महंतांचा जमलाय ‘कुंभमेळा’

वैदिक सिटीची योजना

अयोध्येचा विस्तार अल्पावधीत होऊ शकतो, हे लक्षात घेऊन अयोध्येपासून किमान ८० किलोमीटर परिसरातील विकासकामांनी वेग घेतला आहे. तसेच, नजीकच्या काळात अयोध्येपासून १४ किलोमीटर अंतरावर १४०० एकरावर ‘वैदिक सिटी’ साकारण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे.

वेगवेगळ्या २२ राज्यांनी तेथे भवन उभारण्यासाठी जागांचे प्रस्ताव प्रशासनाकडे दिले आहेत, तर १५० लहान-मोठ्या हॉटेल्स उभारणीच्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. अयोध्येत भाविकांची संख्या एकदम दुप्पट-तिप्पट झाल्यावर पूरक उद्योगांना कुशल मनुष्यबळ लागेल. त्यासाठी गेल्या पाच वर्षांत अयोध्येत आयटीआय सुरू झाले आहे.

शाळा-महाविद्यालयेही आहेतच. एरवी उत्तर प्रदेशातून बाहेर जाणारे अकुशल मनुष्यबळ आता अयोध्येकडे येत आहे. बिहार, मध्य प्रदेशातूनही बेरोजगारांचे जथे येऊ लागले आहेत. व्यापार-उद्योग वाढू लागल्यावर अयोध्येच्या पर्यायाने उत्तर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती येणार असल्याची चिन्हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com