ए १ की ए २ : प्रश्‍नांकित वादळ

दुधाबाबत प्रत आणि प्रमाण असे वर्गीकरण संकरीकरणाच्या लाटेने सुरू झाले. मात्र, खरा संभ्रम निर्माण झाला तो किथ वुडफोर्ड यांनी प्रकाशित केलेल्या ‘डेव्हिल इन द मिल्क’ या पुस्तकामुळे.
Milk
Milk Sakal

दुधाबाबत प्रत आणि प्रमाण असे वर्गीकरण संकरीकरणाच्या लाटेने सुरू झाले. मात्र, खरा संभ्रम निर्माण झाला तो किथ वुडफोर्ड यांनी प्रकाशित केलेल्या ‘डेव्हिल इन द मिल्क’ या पुस्तकामुळे. पाश्‍चिमात्य देशांतील वशिंड नसणाऱ्या सगळ्या गाईंसह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा गोवंश ‘ए १’ प्रकारचा असल्याचा उलगडा करताना १०० संशोधन अभ्यासाचे निष्कर्ष संदर्भांसह विचारात घेण्यात आले. मात्र यामुळे ‘ए १’ आणि ‘ए २’ दूध अशी चर्चा जागतिक पातळीवर या पुस्तकामुळे सुरू झाली. याबद्दलची रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळते.

चिकित्सा आणि जिज्ञासा हे मानवाचे स्थायीभाव आहेत. गरजेतून झालेल्या संशोधनामुळे आज सर्वांना विज्ञानयुगात असल्याचा अभिमान आहे. विषय आहे दुधाबाबत केलेल्या वर्गीकरणाचा आणि संशोधनामुळे जगभर गाजलेल्या वादळाचा. शाकाहारी माणूस दुधाचा आहारात वापर करत असेल तर ‘दुग्धशाकाहारी’ असे म्हटले जाते. प्राणिजन्य दुधाचा मानवाने आहारात वापर करण्याबाबतची सुरुवात अतिप्राचीन असून पाळीव प्राण्यांचे दूध, कंदमुळे, फळे, भाज्या यांचा वापर पीक आणि अन्नधान्यापेक्षा आधी सुरू झाला. गाय-म्हशीच्या दुधाला लवकर मान्यता आणि स्वीकृती मिळाली. पुढे शेळी-मेंढीसुद्धा यांत्रिक दूध दोहनातून सांभाळल्या गेल्या आणि आता ब्रॅंडेड म्हणून उंटिणीचे दूध उपलब्ध आहे, तर अश्‍ववर्गीय दुधाचा बोलबाला माध्यम प्रसारात सर्वदूर होत आहे.

दुधाबाबत प्रत आणि प्रमाण असे वर्गीकरण संकरीकरणाच्या लाटेने सुरू झाले. मात्र खरा संभ्रम निर्माण झाला तो किथ वुडफोर्ड यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामुळे. ‘दुधातील भूत’ (डेव्हिल इन द मिल्क) या शीर्षकात आजार, आरोग्य आणि ‘ए १ - ए २’ दुधाचे राजकारण याचा मुखपृष्ठावर उल्लेख आहे. दूध प्रकाराचे वर्गीकरण करत अनारोग्यपूरक आणि आरोग्यदायी दूध असा संशोधन निष्कर्षांचा अहवाल प्रकाशित झाल्यावर वादळ निर्माण झाले.

न्यूझीलंडमध्ये २००९मध्ये दुधातील प्रथिन घटक ‘बिटा केसिन’ परिणामांचा मानवी आरोग्यावर असणारा संबंध निष्कर्षांद्वारे मांडण्यात आला. भारतीय गोवंश वशिंड असणारा (बॉस इंडिकस), तर पाश्‍चिमात्य गोवंश वशिंड नसणारा (बॉस टॉरस) असल्याचे जगात मान्य असून, भारतीय गोवंशाच्या दुधात घातक प्रथिनांसंबंधित घटक नसल्यामुळे ‘ए २’ या प्रकारचे दूध मानवी आरोग्यास उपयुक्त असल्याचे निष्कर्ष सदर पुस्तकाद्वारे मांडले गेले.

दुधाबाबत मानवी आरोग्यासंबंधाने ‘ए १’ किंवा ‘ए २’ असे वर्गीकरण मांडल्यानंतर भारतीय देशी गोवंशाचा बोलबाला वाढला. देशात साधारणपणे १९६५पासून गोवंश संकरीकरण चूक कसे आणि संकरित गाईंचे (वशिंड नसणाऱ्या) दूध ‘ए १’ असताना अशी पैदास नकोच, असा सूर निर्माण झाला. भारतात आजमितीला ५० देशी गोवंश आहेत. मात्र, बोटांवर मोजता येणारे चार सोडले, तर बाकी सर्व अल्प दूध उत्पादक गोवंश आहेत. मात्र, त्यांचा अन्न उत्पादकतेचा कलंक पशुपालनाच्या अविकसित व्यवस्थापन आणि सांभाळाशी निगडित आहे.

दुधातील घातक प्रथिने म्हणून बिटा केसिनच्या निर्मितीत असणाऱ्या सगळ्या २०९ अमिनो आम्लांचा आराखडा मांडण्यात दूध-रसायनशास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले आहे. या साचेबंद आराखड्यात ६७ व्या स्थानी

‘ए १’ गाईत हिस्टीडीन, तर ‘ए २’ गाईत प्रोलीन आढळले. सर्वांत महत्त्वाची बाब अशी, की बिटा केसिनच्या हिस्टीडीनचा संबंध ‘बिटा कॉस्मो मॉरफीन-७’ या घातक घटकाशी असल्याने ए १ दूध प्रकार मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचा सूर आहे.

पाश्‍चिमात्य देशांतील वशिंड नसणाऱ्या सगळ्या गाईंसह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा गोवंश ‘ए १’ प्रकारचा असल्याचा उलगडा करताना १०० संशोधन अभ्यासांचे निष्कर्ष संदर्भासह विचारात घेण्यात आले आहेत. यासोबत उंदरांत केलेले प्रयोग आणि ए १ दुधाचा विषघटक निष्क्रिय करून मिळालेले निष्कर्ष ए १ दुधात घातक घटक असून, मानवी आरोग्यावर त्यांचा विपरीत परिणाम होतो. याबाबत सविस्तर माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब अशी, की दुग्धसिद्धांत मांडताना वुडफोर्ड यांनी ए २ दूध मानवी आरोग्यास सुरक्षित असून, युरोपीय व भारतीय गोवंश ए २ प्रकारात असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने जागतिक दूध बाजारपेठेत मोठी अस्वस्थता निर्माण झाली. भरपूर दूध देणाऱ्या पाश्‍चिमात्य गाई ए १ दुधाच्या आणि मानवी आरोग्यास मारक असा विषय श्रीमंत देशांना सहजासहजी पटणारा नसल्याने दुधाचे राजकारण हा भाग पुस्तकात मांडून ‘दुधाचे अर्थकारण’ उघडे करण्यात आले आहे.

मुळात ए १ किंवा ए २ असा वर्ग गोवंशात का निर्माण झाला हा प्रश्‍न असून, सुमारे ८००० वर्षांपूर्वी अानुवंशिकतेत आलेली परिवर्तित (म्युटेशन) प्रक्रिया कारणीभूत ठरावी, असा अंदाज आहे. मानवी अनारोग्यास घातक ठरतो तो बिटा कॉस्मो मॉरफीन-७ हा घटक वर्गीकरणाचा निकष असून, ए १ व ए २ वर्गीकरणासाठी डॉक्‍टर, रसायनशास्त्रज्ञ, संशोधक आणि चिकित्सालयीन सांख्याकिक आकडेवारी संलग्नपणे विचारात घेण्यात आली असल्याचे विवेचन पुस्तकात देण्यात आले आहे.

‘दुधातील भूत’ या पुस्तकात शहरीकरणाचा इतिहास, शहरातील आरोग्य समस्या, लोकसंख्येचे आरोग्यविषयक अहवाल, विविध मानवी रोग्यांचे प्रमाण, वसाहतीसंबंधाने अनारोग्य याची सविस्तर माहिती देऊन, सतत वाढत जाणाऱ्या किंवा काही भागात इतर ठिकाणांपेक्षा तीनशे पट अधिक आजार मानवात, बालकांत आढळून आल्याच्या नोंदीचा निष्कर्ष आहे. ॲलर्जी, असहनशीलता, शरीरांतर्गत रोगप्रतिकारक्षमता अशा बाबी आणि दूध आहाराची जोड पुराव्यानिशी सांगितल्यामुळे पुस्तकातील दुग्धसिद्धांत सहजासहजी काणाडोळा करता येणारे नाहीत.

अनिर्बंध पैदास, संकरित पैदास यांमुळे दूध प्रतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आणि दुधात घातक घटक असल्याची बाब पुढे आली. भारतात स्थानिक गोवंश ए २ आहे. शिवाय म्हैस, शेळी, मेंढी, उंटसुद्धा ए २ दूध प्रकारातील आहेत. मात्र पाळीव प्राण्याच्या रक्त नमुन्याची तपासणी केल्याशिवाय ए २ सिद्धता होत नाही. कारण अल्प प्रमाणात देशी गोवंशात ‘ए २’, तर संकरित गोवंशात ‘ए १’ प्रकार आढळले आहेत. तेव्हा देशी गोवंश तपासणीच्या आधारानेच ‘ए २’ असा आरोग्यवर्धक दुधाचा निकष विज्ञानयुगात ठरवावा लागतो.

भारतात दुग्धसिद्धांताबाबत आणि पुस्तकातील सर्व मानवी आरोग्य बाबीसंदर्भाने वरिष्ठ पातळीवर आणि संसदेतही चर्चा झाली असून, ‘ए १’ दुधातील घातक घटकांचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेऊन वर्गीकरण विषयास स्वीकृती देण्यात आलेली नाही. मात्र, प्रत्येक दूध ग्राहक, पशुपालक आणि पशुवैद्यक यांनी घातक दूध घटकाबाबत जागृती असेल तर अनिर्बंध पैदास होणार नाही याचीच अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल.

‘भूत’ शब्दाचा वापर केवळ वैज्ञानिक विचारांसाठी प्रेरक आहे, ती भीती मानवी आरोग्याचे प्रश्‍न वाढवणार नाही यासाठी आवश्‍यक आहे, अन्यथा बाजारपेठ व अर्थकारण दुधासाठी वेगळे नसल्याने मानवी आरोग्याचा मुद्दा तिथे गौण ठरतो. पुस्तक वैज्ञानिक सिद्धांताशी बांधील असल्याने विज्ञानयुगातील प्रत्येकाने वाचल्यास दुधाबाबत गैरसमज टाळता येतील. बालरोग चिकित्सक बॉन इलीयॉट यांनी १९९३मध्ये टिपलेली निरीक्षणे आणि किथ वुडफोर्ड यांची केवळ दूधप्रकार यासंबंधाने वैज्ञानिक टिप्पणी यातून प्रकाशित झालेले पुस्तक दुधाला संजीवक ठरविण्यासाठी भविष्यातही उपयुक्त ठरणारे आहे.

मानवी सामूहिक आरोग्यशास्त्राचे अभ्यासक आणि संशोधक यांचा समन्वय मानवी जीवनमान सुधारण्यासाठी पूरक ठरू शकतो आणि जनावरांच्या पैदाशीत होणाऱ्या चुका सर्वदूर परिणाम घडवू शकतात याची जाणीव करून देणाऱ्या ‘दुधातील भुताचा’ लेखनप्रवास पुस्तकातून समजावून घेणे शिक्षित वाचकांना रंजक ठरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com