दूध, पौष्टिकता आणि जागरूकता

दूध हा मानवी आहारातील अविभाज्य घटक असून, सकस दुधाची मागणी वाढत आहे. दूध ग्राहक म्हणून शहरी ग्राहक अधिक चिकित्सक आणि जागरूक आहे.
Milk
MilkSakal

दूध हा मानवी आहारातील अविभाज्य घटक असून, सकस दुधाची मागणी वाढत आहे. दूध ग्राहक म्हणून शहरी ग्राहक अधिक चिकित्सक आणि जागरूक आहे. स्वच्छ, निर्भेळ, शुद्ध, सकस, ताजे आणि देशी गोवंश दुधासाठी मागणी वाढत असताना सावधानता कशी बाळगायला हवी, याची चर्चा महत्त्वाची ठरते.

महाराष्ट्रात दूध सेवनाचे प्रमाण आरोग्य यंत्रणेच्या शिफारशीपेक्षा कमी आहे आणि पंजाब राज्याच्या सरासरी प्रतिमाणशी सेवनाच्या केवळ पंचवीस टक्के दैनंदिन आहारात दिसून येते. घराघरांत नेहमी शुद्ध आणि निर्भेळ दुधाची मागणी असते. दूध सेवन ही बाब कुणालाही नवीन नाही. मात्र दुधाची प्रत, किंमत, प्रकार, स्रोत याबाबत असणारी विविधता संभ्रम करणारी आहे.

‘अमृतं किम्‌ - गवामृतम्‌’ अशी धारणा मराठी मनात रूढ आहे. आपली संस्कृती आणि संस्कार दूध सेवनाचा आग्रही पुढाकार घेतात. ‘धारोष्ण दूध’ आता शहरी पिढ्यांना दुरापास्त झाले आहे. मात्र धारा सुरू झाल्या, की फेसाळ गरम दुधाने ओठ तृप्त झालेल्या आणि आज ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या पिढीला दुधाची निर्भेळ चव आठवत असेल. विज्ञानयुगात दूध तापविल्याशिवाय पिणे अशक्‍य असणाऱ्या काळात शहरी ग्राहक शुद्ध दूध प्रत मिळण्यासाठीही प्रयत्नरत आहे.

मागणीत वाढ

‘रोगप्रतिकार क्षमताधिष्ठित दूध’ अशी दुधाची जाहिरात आता नामवंत दूध संघांकडून सुरू आहे. कोविडकाळात दुधासाठी स्पर्धा वाढल्या आहेत. देशी गोवंश दुधाच्या विक्रीत मोठी वाढ झाली असल्याने सामान्य ग्राहक पाकीटबंद प्रस्थापित दूध कंपन्यांबाबत साशंक असून, दूध दर, प्रत आणि शुद्धता याबाबत विचलीत झाला आहे. विक्रीयोग्य दूध प्रामुख्याने गोवंश आणि म्हैस यांच्या उत्पादकतेतून मिळते. यात दुग्धजन्य पदार्थनिर्मिती आणि घट्ट चहा यासाठी म्हशीच्या दुधाला प्रथम पसंती आहे. गोवंश दूध म्हणजे पौष्टिकता, मानवी आरोग्य, सकसता, पोषण आणि पूर्ण अन्न हा विचार रुजला आहे. देशी गोवंशाला अल्प दूध उत्पादनाची परंपरा आहे, तरीही देशी गाईचे दूध मिळवण्यासाठी मोठी मागणी आहेच.

गेल्या दशकात देशी गोवंशाच्या दुधातील शुद्धता आणि विषघटकरहित गुणवत्ता मोठ्या प्रमाणात समोर आली. संदर्भासह गोवंश दुधातील मुख्य प्रथिन पोटात प्रतिकूल घटक निर्माण करत नसल्यामुळे ए-२ असे वर्गीकृत करण्यात आले. भारतातील वशिंड असणाऱ्या सर्व प्रजातींच्या देशी गाईंत ए-२ असेच गुणधर्म सिद्ध झाले. भारतात दूध वर्गीकरण सिद्धांत शासकीय पातळीवर स्वीकृत करण्यात आला नसला, तरी देशी गोवंशाच्या सकसतेबाबत आणि पौष्टिकतेबाबत कोणतीही शंका नाही.

देशी गोवंश दूध स्वीकृतीसाठी त्यातील घटक आणि पोषणमूल्ये याच बाबी कारणीभूत आहेत. भाज्यांपेक्षा सरस प्रथिने दुधात असून, लॅक्‍टोज या साखरेचा भाग दुधात आढळतो. रोगप्रतिकारक कर्करोगविरोधक प्रथिने या अंतर्भावामुळे देशी गोवंश दूध अधिक मानवी आरोग्य ठरते. इतर जीवनसत्त्वे, कॅल्शिअम, कमी अमिनो आम्ले आणि अधिक क्षार अशी गुणवत्ता असणाऱ्या देशी गोवंशाच्या दुधाची शिफारस प्रामुख्याने आयुर्वेदिक वैद्यांकडून होते.

दर्जाबाबत जागृती आवश्यक

संकरित गोवंश दूध प्रमाण अधिक असल्याने त्यात निर्माण होणारा पातळपणा दूध प्रतीबाबत देशी गोवंश दुधाच्या तुलनेत फार अधिक ठरतो. दूध वर्गीकरणाचा दावा लक्षात घेता ए-१ या प्रकारातील दूध सकसतेबाबत आणि रोग प्रादुर्भाव रोखण्याबाबत दुय्यम ठरते. यात पोषकता कमी असली तरी संकरित दूध मानवी अनारोग्यास पूरक ठरू नये अशी रास्त अपेक्षा असते. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी, की दूधसंकलनात दिसून येणारी ‘अस्वच्छता आणि निर्जंतुकीकरण’ याबाबत राज्यात मोठ्या जागृतीची गरज आहे. हाताने दूध काढण्याचा प्रकार संपला आणि यांत्रिक दोहन पद्धत सुरू झाल्यास जनावरांची दूध उत्पादकता वाढू शकेल. दूधनिर्मिती, संकलन शास्त्रीय पद्धतीत घडून दुधाची शुद्धता म्हणजे धारोष्ण दुधाची अनुभूती ग्राहकांना लाभू शकेल.

राज्यात खरा प्रश्‍न आहे तो देशी गोवंश दूध म्हणून विकल्या जाणाऱ्या संकरित दुधाचा. देशी गाईचे दूध या नावासाठी दुप्पट दूध-किंमत देणारा शहरी ग्राहक त्रस्त होण्यास कारणीभूत ठरणारी दूध भेसळ कशी थांबवणार, हा यक्षप्रश्‍न आहे. गेल्या ४० वर्षांत दूध ग्राहकांना दूध घटक भेसळ मारक ठरली आणि आता दुधाचीच भेसळ अडचणीची ठरत आहे.

पारदर्शकता आणि विश्‍वासार्हता यापासून कोसो दूर असणारा दूध विक्रीचा धंदा राज्याचा प्रश्‍न आहे. चांगल्या प्रतीच्या दुधाला अधिक दर मिळतो; परंतु दूध प्रत टिकविण्याची मानसिकता बाजारू प्रवृत्तीमुळे घसरते. अनेक दूध विक्री केंद्रांत गोठ्याच्या कार्यदृश्‍यतेबाबत कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, अशा थोड्या उदाहरणांतून प्रामाणिकतेचा प्रश्‍न सुटत नाही.

भेसळीकडे दुर्लक्ष

दूधप्रतीबाबत ‘शून्य नियंत्रणा’च्या कारभारात कधी तरी कुठे तरी होणाऱ्या एक-दोन कारवाया म्हणजे ग्राहकांचे डोळे धुण्याचा कार्यक्रम. कायदे करून न सुटू शकणारा निर्भेळ दुधाचा प्रश्‍न सहसा कोणी हाताळत नाही. राज्यात दूध शुद्धता, भेसळ, दर्जाहीनता याबाबत गांभीर्याने विचार झाल्यास दूध ग्राहकांच्या मोबदल्यात दूध उत्पादक स्वयंनिर्भर होण्याइतका फायद्यात राहू शकतो. मात्र भेसळीची बाधा संपविण्यासाठी अजून तरी लस निर्माण झालेली नाही.

यांत्रिक दोहन, दूध ग्राहक प्रतिनिधी, समक्ष दोहन, आठवडी दूध उत्पादन स्पर्धा, दूध उत्पादनाबाबत ग्राहक-उत्पादक समन्वय, दूध प्रत नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना, देशी गोवंशवृद्धीसाठी ग्राहक सहभाग अशा प्रकारच्या अनेक बाबी यथार्थ ठरू शकतील. सेंद्रिय अन्नासह देशी गोवंश दूध हा विचार शहरी दूध ग्राहकांना भावला असला तरी जागरूकता, सजगता, नियंत्रण यांचा भर देणे क्रमप्राप्त आहे. सर्वसामान्य ग्राहकांची दैनंदिन गरज म्हणून संकरित गोवंश दूध, दुग्धजन्य वापरासाठी म्हशीचे दूध, सकस व पौष्टिकतेसाठी देशी गोवंश दूध या बाजारपेठ असणाऱ्या मागण्या आणि प्रतीपरत्वे त्यांची किंमत नेहमीसाठी वेगवेगळी असणार; मात्र त्यातील एकाही प्रकारात भेसळ नको यासाठी उत्पादक - ग्राहक समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. महत्त्वाची बाब अशी, की उत्पादक - ग्राहक यांत असणारी साखळीच अधिक घातक असते यात शंका नाही.

तात्पर्य असे, की दुधाबाबत शिक्षित ग्राहकांची जागरूकता अधिक महत्त्वाची असून, कुवतीप्रमाणे दूध प्रकार स्वीकारल्यास आरोग्यसंवर्धनास जोड लाभेल. पुन्हा मुद्दा हाच, की दूध विकत घेऊन वापराबाबत आपण खरोखर सजग असल्यास राज्यात प्रतिमाणशी प्रतिदिन दूध सेवन वाढणार अशी अपेक्षा करता येईल. दूध पिण्याबाबत नकार आणि दूध प्रकार विषमतेबाबत मंथन यातून शहरी दूध ग्राहकांमध्ये प्रगल्भता दिसून येणार नाही.

(डॉ. नितीन मार्कंडेय, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी - ९४२२६ ५७२५१)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com