
एकदा देवांनी अथक परिश्रम करून अमृताचा मोदक तयार केला व तो घेऊन ते शंकराकडे आले. पार्वतीच्या हातात मोदक देऊन ते परत गेले. "स्कंद' व "गणेश' या दोघांना या मोदकाची बातमी कळली आणि ती दोघे मोदक मिळावा म्हणून पार्वतीजवळ हटून बसली.
पार्वती म्हणाली, ""हा महाबुद्धी मोदक आहे. याचा नुसता वास घेतला तरी अमरत्व प्राप्त होते. इतकेच नव्हे तर जो हा मोदक खाईल, तो सर्व शास्त्रात प्रवीण होईल व शस्त्रास्त्र विद्येतही निपुण होईल.''
हे ऐकल्यावर स्कंद व गणेश हे दोघेही "मला आधी हवा.' असा हट्ट करू लागले. तेव्हा पार्वतीने एक नामी युक्ती शोधून काढली. ती आपल्या त्या दोन पुत्रांना म्हणाली, ""तुम्ही दोघेही पृथ्वीप्रदक्षिणेला जा. जो आधी प्रदक्षिणा करून परत येईल, त्याला मी हा मोदक देईन.'