Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला विश्वाचा वाढदिवस का म्हणतात?

Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023Sakal Digital

Gudi padwa 2023 Significance:

गुढीपाडवा हा सत्संकल्पांचा दिवस मानला जातो. गुढीपाडवा हा आरोग्याचा एक उपचारही आहे. या सणामागची शास्त्रीय भूमिका नीट समजावून घेणे आवश्यक आहे.

भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तातील हा एक मुहूर्त असल्याने या दिवसाचे महत्त्वही अधिक असते. खरेतर नवीन वर्ष म्हणजे काय? काळ हा सतत गतिमान असतो. वर्तुळाला जशी सुरुवात किंवा अंत असे काही नसते तशीच ती काळालाही नसते. आपण जेथून सुरू करू ती नवीन वर्षाची सुरूवात होऊ शकते. त्यामुळे भारतामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात वर्षाला ‘शालिवाहन शक’ असे आपण म्हणतो. म्हणजे शालिवाहन राजाने ही कालगणना सुरू केली. त्याने ती या दिवशी सुरू केली त्याला ज्योतिषाचा मोठा आधार आहे.

Gudi Padwa 2023
Bhagavad Gita : यज्ञाचे प्रकार

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूर्व क्षितिजावर सर्व ग्रह जवळजवळ शून्य अंशात असतात. म्हणजे पूर्व क्षितिजावर मेष रास असते, सूर्य असतो, चंद्र असतो आणि अशा रीतीने तेथून सुरुवात होते मंडलात फिरायची. मात्र नंतर प्रत्येक ग्रह आपापल्या गतीप्रमाणे फिरत राहतो. गुजरात व उत्तर भारतात विक्रम संवत्‌ मानले जाते. विक्रम हा उज्जैनचा राजा होता. त्याचा ज्योतिषावर मोठा अधिकार होता. त्याने सुरू केले विक्रम संवत्‌ आणि ते दीपावलीत येणाऱ्या पाडव्याच्या दिवसापासून मोजायची पद्धत आहे. काही अंशी तेही बरोबर आहे. याचे कारण जसजसे आपण उत्तरेकडे जाऊ तसतसा वेळेत बदल होतो, ऋतूत बदल होतो.

सणाची योजना


एक गोष्ट नक्की की, एका विशिष्ट ठिकाणाहून जीवनाची सुरुवात होते असे म्हटले तर ज्या दिवशी संपूर्ण विश्र्वाची सुरुवात झाली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे हा दिवस विश्र्वाचा वाढदिवस आहे असे म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच आपल्याकडे हा सण किंवा ही परंपरा अति प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.

अर्थात एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक भारतीय सण, प्रत्येक परंपरा ही फक्त प्रथा किंवा धर्म म्हणून पाळायची नसते तर ती प्राणिमात्राच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी व संतुलनासाठी योजलेली एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये देवांना काही मिळायचे नसते. त्यात धर्माचा काही संबंध नाही.

गुढीपाडव्याचा सण ही सुद्धा अशीच एक योजना होय. कशी योजना? तर नवीन वर्ष सुरू होते तेव्हा म्हणजे वसंत ऋतूत सगळीकडे नवीन पालवी फुटते, फुले येतात. जणू वसंत ऋतू सृष्टीला नटविण्याचे काम करत असतो. कशासाठी? तर हे सृष्टिसौंदर्य म्हणजे जणू मायेचेच स्वरूप असते आणि या मायाजालाचे प्रयोजन असते. आपल्याला आकर्षित करण्याचे.

आपण उठून कामाला लागावे, काही तरी खास करण्यासाठी उठून उभे राहावे याचे निदर्शक म्हणून गुढीची योजना केलेली असते. उठण्याने काय होते तर आपला मेरुदंड सरळ होतो. मेरुदंडाचे प्रतीक म्हणजे हा बांबू आहे. वर डोके म्हणून घडा ठेवलेला आहे, गुढीला बांधलेले वस्त्र हे झेंड्यासारखे काम करते. झेंडा विजयाचे प्रतीक असतो. तशा प्रकारे नवीन वर्ष आनंदात सुरू व्हावे. (is gudi padwa a hindu new year)

Gudi Padwa 2023
Gudi Padwa: हार-कड्यांसाठी लाकडी साचे बनवणारे कारागीर दुर्मिळ! परंपरागत सुतारकाम कला नामशेष होण्याच्या मार्गावर

कडुनिंबाचे महत्त्व (Kadulimb Benefits)

सण-समारंभ म्हटले की अन्नाचा संबंध आलाच. समतोल जेवावे हे आपल्याला माहिती आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी दोन गोष्टी विशेष समजल्या जातात. एक म्हणजे कडुनिंबाची चटणी. परदेशातून हळदीसाठी पेटंट घेण्याचा जसा प्रयत्न झाला तसे कडुनिंबासाठीही झाला. कडुनिंब अत्यंत कडू असला तरी तो अमृतासमान आहे. असे म्हणतात की, पृथ्वीवर ज्या ठिकाणी अमृताचा बिंदू पडला त्या ठिकाणी हा वृक्ष उगवला. हा वृक्ष अमृतासमान आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी याच्या कोवळ्या पानांची चटणी केली जाते. ही चटणी वर्षभर सुद्धा खाता येते. (Neem Benefits)

साथीच्या आजारांना प्रतिबंध व्हावा म्हणून तसेच इम्युनिटी वाढण्यासाठी ही चटणी उत्तम आहे. या चटणीत अनेक इतर द्रव्ये टाकलेली असतात. घराघरांत हे माहिती असते. कडुनिंबाची वाळलेली पाने जाळली तर मच्छर-डासांपासून रक्षण होते.

गोडाशिवाय सण असेल का?

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्. प्रत्येक सणाचा विशिष्ट पक्वान्नाशी संबंध असतो. त्यासाठी भारतीय परंपरेत गुढीपाडव्यासाठी श्रीखंड सांगितलेले आहे. हे श्रीखंड आयुर्वेदिक आहे. त्याच्यासाठी दही लावत असताना मडक्याला आतून कापराचा धूर दिला जातो. तयार दही काढून घेऊन त्यात इतर द्रव्ये मिसळून चक्का बांधला जातो. मग त्यात इतर द्रव्ये मिसळली जातात त्यावेळीही त्या भांड्याला कापराचा धूर दिलेला असतो. त्यात मध, तूप, वेलची, दालचिनी वगैरे द्रव्ये असतात. असे श्रीखंड गुडघेदुखी असणाऱ्यालाही बाधत नाही. तेजःपुंज शरीर, कांती, बुद्धिमत्ता, ताकद व प्रतिकारक्षमता वाढविणारे हे अप्रतिम टॉनिक वर्षाच्या सुरुवातीला खायचे असते, मात्र वर्षभरात अधूनमधून श्रीखंड-पुरीचा बेत असतोच. अशा रीतीने गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करू शकतो. (Health Benefits of Shrikhand)

मन जोपर्यंत प्रसन्न नसेल तोपर्यंत आरोग्य नीट राहत नाही. त्यामुळे या दिवशी संगीत, नाटक, सिनेमा वगैरेंचा लाभ घेऊन कुटुंबाबरोबर आनंद घेतला जातो. सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन वर्षभर मिळून चांगले काम करू, प्रगती करू, एखादा उद्योग सुरू करू वगैरे ठरविले जाते. अशा रीतीने गुढीपाडवा हा मनुष्यमात्रासाठी आरोग्याचा एक उपचार आहे, मानसिक आरोग्याचा उपचार आहे, आत्मिक आरोग्याचा उपचार आहे आणि तो प्रत्येकाने त्यातील वैज्ञानिकता लक्षात घेऊन साजरा केला तर त्याचे खरे प्रयोजन पूर्ण होऊ शकते. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com