
Gudi Padwa: हार-कड्यांसाठी लाकडी साचे बनवणारे कारागीर दुर्मिळ! परंपरागत सुतारकाम कला नामशेष होण्याच्या मार्गावर
सिन्नर (जि. नाशिक) : गुढीपाडवा (Gudi Padwa) म्हणजे मराठी नववर्षाचा प्रारंभ दिन. या दिवशी प्रत्येक जण घरावर गुढी उभारून हा सण साजरा करत असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या गुढीबरोबरच हमखास गाठीहार बांधलेला असतो. (gudi padwa festival art of mold making and artisans who make molds becoming rare nashik news)
साखरेपासून बनवलेला गाठीहार आणि त्यासोबत असणारे कडे याला गुढीपाडव्याला महत्त्व असते. हा गाठीहार आणि कडे केवळ सागवानी साच्यात बनवले जातात. मात्र काळाच्या ओघात साचे बनवण्याची ही कला आणि साचे बनवणारे कारागीर दुर्मिळ होत आहेत.
आज केवळ नाशिक जिल्ह्यातील वावी, सोलापूर आणि जालना जिल्ह्यात सुतार समाजातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कारागीर आपले अस्तित्व टिकवून आहेत. साखरेच्या पाकापासून होतं काम करून गाठी गाड्यांचे उत्पादन घेतले जाते. गुढीपाडव्याच्या तोंडावर महिनाभर आधीपासून घरगुती कारखान्यांत हे काम सुरू असते.
यासाठी आवश्यक असणारे साचे केवळ सागवानी लाकडाचेच बनवलेले असतात. हे साचे बनवविण्याची कला पारंपरिक पद्धतीने सुतार समाजातील कारागिरांनी आत्मसात केली आणि जिवंत ठेवली आहे. मात्र सध्याच्या पिढीने या कलेकडे पाठ फिरवली आहे. सागवानी लाकडाच्या फळ्या काढून त्याचे विशिष्ट पद्धतीने साचे बनवले जातात.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
त्यात गाठी तयार करण्यासाठी लांब पट्टीचा साचा असतो. तर कड्यांसाठी वेगळे साचे असतात. एक हार किंवा कडे बनवायचे म्हटले तर एकसारख्या नक्षीकाम कोरलेल्या दोन पट्ट्या समोरासमोर ठेवल्या जातात. अशा पद्धतीने एकाच वेळी पाच गाठीहार तयार होतील, अशी साच्याची रचना असते.
पूर्वीपासून गाठीकड्याचे साचे बनवणारे कारागीर सिन्नर तालुक्यातील वावी गावात होते. सध्या केवळ एकच कारागीर असून तोही उतारवयात आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यात आणि जालना शहरात असलेल्या सुतार गल्लीत काही कारागीर आहेत. मात्र या सर्वांची एकत्रित संख्या मोजली तर ती केवळ हाताच्या बोटावर मोजता येईल.
नवी पिढी साचे बनवण्याच्या या व्यवसायापासून दूर गेली आहे. परंपरेने चालत आलेला हा व्यवसाय खंडित होणार असल्याची भीती वावी येथील कारागीर नामदेव जाधव यांनी व्यक्त केली. जाधव हे आजोबांच्या मार्गदर्शनाखाली साचे बनवण्याचे काम वयाच्या दहाव्या वर्षापासून करत आहेत.
त्यांचे वडील भीमा सुतार आणि चुलते दगडू सुतार हे दोघे तळ कोकणापर्यंत गाठी कडयाचे साचे बनवणारे कारागीर म्हणून प्रसिद्ध होते. निम्म्या महाराष्ट्रातून कारखानदार त्यांच्याकडून साचे बनवून घ्यायचे. कारागिरांच्या घरात वर्षभर हेच काम चालायचे. उर्वरित महाराष्ट्राचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यात दोन किंवा तिघे या व्यवसायात असून, जालन्यातील सुतार गल्लीत मोजके कारागीर साचे बनवतात.
पारंपरिक साच्याबरोबरच इतरही साचे
केवळ पारंपरिक गाठीहार आणि कडे बनवण्यासाठी साचे नसतात. तर रुखवतात मांडण्यासाठी नारळ, तुलसी वृंदावन याशिवाय मोर, हत्ती, विठ्ठल-रखूमाई, शिवाजी महाराज, गदा, शंख, फुले या प्रकारातील वस्तूही साखरेच्या पाकापासून बनवल्या जातात.
सागवानी लाकडाचे साचे बनवण्यासाठी लहान-मोठ्या आकाराच्या व जाडीच्या पट्ट्या काढल्या जातात. त्यावर हाताने चित्रे रेखाटली जातात व कोरीव काम करण्यात येते. हे कोरीव काम दोन लाकडांवर करण्यात येते. त्यामुळे ही वस्तू आकाराने बिनचूक असते. त्यावरची कलाकुसरही ठळकपणे दिसते.
मजुरी कमी असल्याने कारागीर नाराज
लाकडी साचे बनवणारे कारागीर दुर्मिळ झाल्यामुळे हार-कड्यांचे बनविणाऱ्या कारखानदारांनी प्लास्टिक व इतर प्रकारातील मोल्डद्वारे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विशिष्ट पद्धतीने बनवलेला साखरेचा पाक या मोल्डमध्ये टाकल्यावर नुकसानच अधिक होते.
त्यामुळे हे मोल्ड बाजूला टाकण्यात येऊन पारंपरिक साच्यातूनच उत्पादन घेण्याला कारखानदारांनी पसंती दिली. नवीन साचे बनवून मिळत नसल्याने अनेक कारखानदार जुने साचे जपून वापरतात. या व्यवसायात मजुरी कमी आणि काम जास्त असल्याने नवीन पिढी साचे बनवायला उत्सुक नसल्याची खंत नामदेव जाधव यांनी व्यक्त केली.