esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumba Devi temple

श्रमिकांची आई मुंबादेवी

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : मुंबादेवी (Mumba devi) ही शहरातील एक प्रमुख मानाची देवी आणि मुंबईची आद्यदेवता होय. नावाप्रमाणेच ही देवी मुंबईची आई असली, तरी त्यातही श्रमिकांची आई असा आगळावेगळा बहुमान तिला मिळाला आहे. मरीन लाईन्स (Marine Lines) परिसरात असलेल्या या देवीच्या देवळाभोवती असलेल्या वेगवेगळ्या बाजारपेठा (Markets) पाहिल्या की हा बहुमान सार्थ असल्याची खात्री होते.

हेही वाचा: अपना बँकेच्या नव्या योजनात महिलांना प्राधान्य

या देवीबद्दल बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. मुंबईतील कोळी बांधवांची ही देवी असून त्यांनीच तिची स्थापना केल्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटावर (पूर्वीचे व्हीटी-बोरीबंदर रेल्वेस्थानक) कोळी बांधवांनी या देवीची स्थापना केली. नंतर व्हीटी रेल्वेस्थानकाची ऐतिहासिक इमारत बांधण्यास सुरुवात झाल्याने तेव्हाच्या ब्रिटिश गव्हर्नरने कोळी बांधवांना विनंती करून मूर्तीची प्रतिष्ठापना अन्यत्र करण्यास सांगितले. तेव्हा काही काळ ही मूर्ती आजच्या मेट्रो सिनेमाजवळील धोबीतलाव परिसरात होती व नंतर हे आजचे मंदिर उभारले गेले. हे मंदिरही किमान दोनशे वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

मुंबादेवी ही सर्वांचीच लाडकी असली तरी मुंबईतील उत्तर भारतीय नागरिकांची तिच्यावर विशेष श्रद्धा आहे. उत्तर भारतीय नागरिकांची रीघ वर्षभर तिच्या दर्शनाला लागलेली असते. त्यांच्यातली एक श्रद्धेची प्रथा अशी आहे की, ही मंडळी आपल्या मूळ गावी जाताना मुंबादेवीचा आशीर्वाद घेऊन जातात. तसेच तेथून पुन्हा मुंबईत परत आले की, देवीचे दर्शन घेऊनच आपल्या कामाला सुरुवात करतात. मेहनत करणाऱ्याला ही देवी उपाशी ठेवीत नाही, अशी तिची ख्याती आहे. या देवळाभोवती सोने-चांदी-हिरे दागिने, तसेच कपडा, स्टील, तांबा-पितळ या बाजारपेठेचे वलय पाहिले की याची खात्री पटते. या झळाळणाऱ्या बाजारपेठेचा जणू हारच या देवळाभोवती गुंफला आहे, अशीही भक्तांची समजूत आहे.

ट्रस्टद्वारे व्यवस्था

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या देवळाच्या व्यवस्थेसाठी ट्रस्ट करण्यात आला असून त्यावर सॉलिसिटर, डॉक्टर, सनदी लेखापाल, उद्योजक असे मान्यवर आहेत. देवळात जमा होणाऱ्या निधीपैकी बहुतांश खर्च हा धार्मिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक कारणांसाठी होतो. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, रुग्णांना साह्य तसेच रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा-उपकरणे यासाठी निधी खर्च केला जातो. चैत्र आणि अश्विन नवरात्रीत येथे देवीला तसेच देवळाला विशेष सजावट-रोषणाई केली जाते. या वेळी येथे लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यानिमित्ताने येथे नवचंडी पाठ, नवचंडी यज्ञ, होमहवन आदी धार्मिक विधीदेखील केले जातात.

loading image
go to top