Ram Navami 2024: मर्यादा पुरुषोत्तमाचे अमर्याद गुण

Ram Navami 2024: अर्थात या पुरुषोत्तमाच्या वर्तनाला बंधन म्हणजे सामर्थ्याचा प्रत्यय देण्यावर मर्यादा नसून तो प्रत्यय कुठे, किती आणि कसा द्यायचा, याचे भान हा त्याचा अर्थ आहे.
Ram Navami 2024:
Ram Navami 2024:Sakal

जयंत देशपांडे

Ram Navami 2024 indian festival Qualities of Lord Ram

भारतीय सनातन परंपरेत ईश्वराच्या दशावतारांची संकल्पना रूढ आहे. या दशावतारांत श्री प्रभुराम यांच्या अवताराचे विशेष महत्त्व आहे. तेव्हाच्या सामाजिक स्थितीत दुष्टांचे वाढलेले प्राबल्य संपवून आणि सुष्टांची होत असलेली गळचेपी थांबवून धर्माची पुनर्स्थापना करणे, हे या अवतारातील प्रधान कार्य होते.

या अवतारात प्रभुरामांनी हे कार्य तर केलेच, तथापि भविष्यात पुन्हा असे अराजक माजू नये, यासाठी पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत पुरुषांचे वर्तन कसे असावे, याचा वस्तुपाठ घालून दिला. ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे कुटुंब आणि समाजाच्या पोषणाची, संरक्षणाची, स्वास्थ्याची आणि समृद्धीची जी जबाबदारी त्याच्याकडे सोपविली जाते, ती जबाबदारी पार पडताना त्याचे वर्तन कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे प्रभुरामाचे जीवन.

आपल्या आयुष्यात प्रभुरामांनी विविध भूमिका घेतल्या. निर्णय केले, न्याय दिला, दंड दिला. कुणाची बाजू घेतली तर कुणाचा शेवट केला. प्रभुरामांनी हे सगळे करताना आपल्या वर्तनासाठी ज्या सिद्धांतांचा आधार घेतला आणि मर्यादा आखून घेतली, त्यातून समृद्ध झालेल्या त्यांच्या वर्तनाने त्यांना मर्यादा पुरुषोत्तम ही उपाधी प्राप्त करून दिली.

Ram Navami 2024:
Ram Navami 2024 : आज रामनवमी.! जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व अन् पूजेची पद्धत

अर्थात या पुरुषोत्तमाच्या वर्तनाला बंधन म्हणजे सामर्थ्याचा प्रत्यय देण्यावर मर्यादा नसून तो प्रत्यय कुठे, किती आणि कसा द्यायचा, याचे भान हा त्याचा अर्थ आहे. प्रभुरामांचे वर्तन ज्या विविध गुणांनी आभूषित होते आणि ज्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम उपाधी लाभली, त्यातील आठ गुणांची चर्चा सर्वाधिक झालेली पाहायला मिळते. वाल्मिकी ऋषी, संत तुलसीदास आणि अन्य संतांनी प्रभुरामांच्या या अलौकिक गुणांचे वर्णन आपल्या रचनांनाच्या माध्यमातून केले आहे.प्रभुरामांच्या वर्तनाला आणि एकूणच कर्तृत्वाला असामान्य करणाऱ्या या गुणात १४ वर्षांचा वनवास असेल किंवा बलाढ्य रावणासोबतचा संघर्ष असेल, त्यावेळी दाखविलेल्या धैर्याचा समावेश होतो.

सुग्रीव, हनुमान, केवट, निषाद, बिभीषण आदींना नेतृत्वाचा अधिकार देताना दाखविलेली मैत्री उठून दिसते. आपले कुटुंब आणि आप्त याहून प्रजेला सर्वस्व मानून प्रभुरामांनी नि:स्वार्थ भावाचा प्रत्यय दिला. शबरीसंबंधीचे प्रभुरामांचे प्रेम आणि वनवासातील पशु-पक्षी सेवा त्यांच्यातील करुणेला प्रकट करणारे आहे. सगळे गुण माणसाला समृद्ध करणारे आहेत. राजपुत्र असणारे प्रभुराम ज्या पद्धतीने वशिष्ठ आणि अन्य ऋषींच्या समोर नतमस्तक होतात, त्यांची सेवा करतात, त्यातून त्यांची नम्रता व्यक्त होते.

आपल्याकडे हवे ते सामर्थ्य असतानाही समोरच्याला संधी देणारे, त्याच्यातील बदलाची प्रतीक्षा करणारे प्रभुराम आयुष्यातील प्रत्येक कठीणप्रसंगी आपल्यातील संयमाला अधोरेखित करत गेले. प्रभुरामांचे संतुलन चकित करणारे होते. विशेषत: वनवासातील अनेक प्रसंग संतुलनाची परीक्षा पाहणारे होते. तथापि, प्रभुरामांनी त्या प्रत्येकवेळी संतुलित वर्तनाचा परिपाठ घालून दिला. सत्यवचन प्रभुरामांचे दुसरे नाव होते.

आपल्या आयुष्यात नको वाटणारे प्रसंग टाळता आले असते, अनेक गोष्टी मनासारख्या करून घेता आल्या असत्या. मात्र, त्यासाठी सोडावी लागणारी सत्याची कास प्रभुरामांनी मान्य केली नाही आणि सत्यासाठी, वचनाच्या बांधिलकीसाठी अनेक संकटे सहन केली.

प्रभुरामांना मर्यादा पुरुषोत्तम ही उपाधी मिळवून देणाऱ्या काही महत्त्वाच्या गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा वर केली असली, तरी याहूनही अनेक उत्कृष्ट गुणांचा समुच्चय प्रभुरामांच्या व्यक्तित्त्वात पाहायला मिळतो. मनुष्यत्त्वाचा गौरव करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रभुराम समोर येतात. आज प्रभुरामांचा जन्मदिन, त्यानिमित्त त्यांच्या पावनस्मृतींना दंडवत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com