राम जन्मला गं सखी...

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आठ दिवसांपूर्वी ब्रह्मध्वजाचे पूजन केले. आज आहे श्रीरामवनमी, प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मदिवस.
ram navami
ram navamisakal

राम हे सृजनतत्त्व आहे. रामनामाच्या साह्याने, रामनामाच्या प्रभावाने दोन टोकात म्हणजे पृथ्वीपासून आकाशापर्यंत विस्तारलेलं हे जीवन जड आणि चेतन, आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव, ‘शरीर’ आणि ‘जाणीव’ म्हणजेच ‘सीता’ आणि ‘राम’ एकत्र आले तरच जीवनाचे सार्थक होऊ शकते.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण आठ दिवसांपूर्वी ब्रह्मध्वजाचे पूजन केले. आज आहे श्रीरामवनमी, प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मदिवस. रामजन्म होणारच होता. तो कोणीही रोखू शकणार नव्हते. कारण तशी ईश्र्वरी योजना होती. ऋषीमुनींनी केलेल्या चिकित्सेला अपयश येणे शक्यच नव्हते. राम जन्मण्यामागचा उद्देशही उदात्त होता. हेतू चांगले असले, की साधने आपोआप गोळा होतातच. दुष्टांचे निर्दालन, प्रजेला अभय आणि रामराज्याची स्थापना हा ईश्र्वरी संकल्प असल्यामुळे रामावतार अपरिहार्य होता.

श्रीरामांच्या जन्माच्या आधी दशरथराजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. अनेक ऋषीमुनी, दशरथराजाचे मंत्री यांनी एकत्र बसून सर्व राज्याच्या चांगल्यासाठी चिंतन व चर्चा करून नंतर दशरथराजाने स्वतःच्या मनात आत डोकावून मनाने सांगितलेला निर्णय घेतला. गीतरामायणामध्ये याबद्दल म्हटले आहे, ‘मीच माझिया मनात त्यांच्या साक्षीने मथिले’.

या यज्ञात पायसदान महत्त्वाचे होते. हे पायस स्वतः अग्निदेवांनी सुवर्णाच्या थाळीतून आणून दिले. शरीरातील सर्व धात्वग्नींनी नीट काम करावे, यासाठी ही पायसाची योजना होती. एका धातूचे रूपांतर पुढच्या धातूत नीट होणे यामुळे साध्य होऊ शकते, शरीरातील हॉर्मोन सिस्टीम योग्य प्रकारे काम करू शकते. राण्या गर्भवती झाल्या. यथावकाली प्रसूत झाल्या.

कौसल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न; तर कैकयीला भरत असे चार सुपुत्र जन्माला आले. माता-पिता, प्रासादातील व नगरातील सर्वांच्याच आनंदाला सीमा राहिल्या नाहीत. मोठ्या घरात जन्म झाला आहे तेव्हा ‘बडे बाप के बडे बेटे’ या उक्तीनुसार संपत्ती उडवणे, छानछौकीत राहणे वगैरे गोष्टी त्यांनी मुळीच केल्या नाहीत.

महत्त्व मेरुदंडाचे

मूल मोठे होत असताना त्याला अनेक प्रकारे सांभाळून, त्याच्याकडून विशेष व्यायाम करवून, त्याच्या मेरुदंडाची काळजी घेऊन, तसेच धृती, स्मृती, प्रज्ञा वाढविण्यासाठी त्याच्या मेंदूची विशेष काळजी घेतली जाते. हे सर्व करायचे असेल तर प्रत्येकालाच माहीत हवे की, मेरुदंड हा आपल्या शरीराचा मुख्य आधार आहे. मेरुदंडाच्या माध्यमातून मेंदू सर्व शरीरावर ताबा ठेवतो.

मेरुदंड सर्व शरीराला लागणारी शक्ती, संवेदना पुरवतो; तसेच चलनवलनासाठी सर्व आज्ञा वाहून नेतो (इंद्रियांकडून मेंदूकडे व मेंदूकडून इंद्रियांकडे). अतिशय तातडीने स्नायूंना संदेश देणे आवश्‍यक असल्यास मेंदूतून संदेश येण्यापूर्वीच मज्जारज्जूकडून संदेश मिळू शकतो. जणू एक छोटा मेंदू प्रत्येक मणक्यात किंवा मेरुदंडावर असलेल्या मुख्य स्थानांमध्ये (षट्चक्रांमध्ये) असावा.

बालकाच्या जन्मानंतर त्याची बुद्धी कशी वाढेल याकडे लक्ष द्यायला हवे असतेच. बरोबरीने त्याच्या मेरुदंडाकडे नीट लक्ष द्यायला हवे. जन्माला आलेल्या अपत्याने पुढे मोठे झाल्यावर काही विशेष संशोधन करावे किंवा मानवतेसाठी काही विशेष कार्य करावे, अशी अपेक्षा ठेवून त्यासाठी त्याला काही मूळ शिक्षण द्यायला हवे. याचा विचार न करता त्याला अशी पदवी मिळावी, ज्यामुळे त्याला पैशांची खाण सापडेल किंवा त्याला नोटा छापायचा कारखाना टाकता येईल, याकडेच फक्त लक्ष दिले जाते.

नाही घेतली जात त्याच्या मेंदूची काळजी, नाही घेतली जात त्याच्या मेरुदंडाची काळजी. मेंदूएवढे गूढ व तरल असे दुसरे स्थान नाही. मेंदूची संपूर्ण कार्यपद्धती अजूनही माणसाला कळलेली नाही, मेंदूवर स्वामीत्व कसे ठेवावे हे कळण्याचा तर प्रश्र्नच नाही. शरीराचे स्नायू मजबूत कसे असावेत, मुलगा किंवा मुलगी गोरीपान कशी दिसावी, याकडे भरपूर लक्ष दिलेले दिसते. त्यादृष्टीने प्रयत्न केलेलेही दिसतात. परंतु बालकाच्या मेंदूच्या विकासाकडे लक्ष दिलेले सापडत नाही.

मेरुदंड हेच शिवधनुष्य

लहानपणाचे कौतुक संपते न संपते एवढ्यात पुढचे शिक्षण व व्होकेशनल ट्रेनिंग (राजपुत्र असल्याने त्यांना अस्त्र-शस्त्र विद्या, निर्णय कसे घ्यायचे वगैरे) घेण्यासाठी राम-लक्ष्मण या दोन्ही कुमारांना विश्र्वामित्र ऋषींच्या आश्रमात दाखल व्हावे लागले. एवढ्या लहान राजकुमारांना ऋषींच्या स्वाधीन करून त्यांना आश्रमासारख्या खडतर जीवनपद्धतीत पाठवण्याची राजा दशरथ, वसिष्ठ-विश्र्वामित्रादी ऋषी वगैरेंना एवढी गरज वाटली कारण कुमारांच्या ब्रह्मध्वजाची (मेरुदंडाची) काळजी नीट घेतली गेली पाहिजे, याची त्यांना पूर्णतः कल्पना होती.

शिक्षण संपल्यानंतर प्रभु रामचंद्र ज्यावेळी मिथिलेला आले तेव्हा सीतास्वयंवर योजण्यात आलेले होते. राम व लक्ष्मण हे दोन्ही राजकुमार ऋषींबरोबर मिथिलेला आलेले होते. तेथे देशोदेशींचे राजे-महाराजे उपस्थित होते. तेथे अनेक राजे-महाराजे उपस्थित होते, रावणासारखे मोठे सम्राटही उपस्थित होते. पण त्यांनी स्वतःच्या मेरुदंडाची घेतलेली काळजी अतिशय सर्वसामान्य होती म्हणूनच एकाचाही मेरुदंड पूर्णपणे विकसित झालेला नव्हता.

शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवायची आणि सर्व कार्ये करायची हा स्वयंवरासाठी पण होता. मेरुदंड हेच शिवधनुष्य आहे व याची किल्ली छोट्या मेंदूच्या ठिकाणी असते. पण जिंकला तरच जाणीवरूपी श्रीरामांना सीतारूपी शरीर जोडले जाऊ शकणार होते. हेच ते स्वयं-वर. यातील स्व हा माझे-तुझे यातील नसून तो ते परमपद परमात्मा, परमपुरुष यांचा निदर्शक आहे.

परमात्मात्म्याने स्वतः ठरवून एकरूप होण्याचा निर्णय घेतला व तेथून जीवनाची- जिवंतपणाची सुरुवात झाली. श्रीरामांच्या ब्रह्मध्वजाची (मेरुदंडाची) काळजी नीट घेतली गेली असल्यामुळे ते शिवधनुष्याला प्रत्यंचा जोडू शकले व त्यांनी पण जिंकला. लग्न झाल्यानंतर सीतारूपी शरीर व जाणीवरूपी राम यांनी एकत्र कार्य करताना रावणासारख्या अहंकाररूपी राक्षसाचा वध केला.

रामनामाची महती मोठी. स्वतः वाल्मिकी रामनामाने उत्क्रांत झाले. वाल्मिकींना रामस्मरणातून राम गवसला. आपला उत्कट अनुभव सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी रामायण रचले. रामनामाचे महत्त्व सांगताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात ‌‘मुखी राम विश्राम तेथेचि आहे’. विश्राम ही मनुष्यमात्राच्या शांतीसाठी, समाधानासाठी आणि नवीन कार्यासाठी नितांत गरजेची अवस्था आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण विश्रामाला पारखे असतो.

विश्राम हा शारीरिकही नसतो तर ही एक मानसिक अवस्था आहे. मुखातला राम अंतःकरणापर्यंत झिरपला की ती प्राप्त होते. राम हे एक सृजनतत्त्वही आहे. रामनामाच्या साह्याने, रामनामाच्या प्रभावाने दोन टोकात म्हणजे पृथ्वीपासून आकाशापर्यंत विस्तारलेलं हे जीवन जड आणि चेतन, आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव, ‘शरीर’ आणि ‘जाणीव’ म्हणजेच ‘सीता’ आणि ‘राम’ एकत्र आले तरच जीवनाचे सार्थक होऊ शकते.

अशा श्रीरामांच्या कार्याचे चिंतन, मनन करून रामकथेमागची महासंकल्पना समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याचा आपण सर्व संकल्प करू व आज आनंदाने गाऊ या...

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी

गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती

दोन प्रहरि कां गं शिरीं सूर्य थांबला?

राम जन्मला गं सखी राम जन्मला...

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com