गुरुपुष्यामृत योग! 'या' मौल्यवान गोष्टी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस |Guru Pushya Amrit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guru Pushya Amrit

गुरुवारी चंद्र 'पुष्य' नक्षत्रात असला तर त्या योगाला 'गुरुपुष्यामृत' योग म्हणतात.

गुरुपुष्यामृत योग! 'या' मौल्यवान गोष्टी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

आज गुरुवार, (ता. २५) नोव्हेंबर २०२१, आज एक विशेष योग आहे, तो म्हणजेच 'गुरुपुष्यामृत'. गुरुवारी चंद्र 'पुष्य' नक्षत्रात असला तर त्या योगाला 'गुरुपुष्यामृत' (Guru pushya amrit) योग म्हणतात. आज सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी ६ वाजून ४८ मिनटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. सुवर्ण खरेदीसाठी, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी, श्रीमहालक्ष्मी उपासनेसाठी, दुर्गा सप्तशती- श्रीसूक्त पठनासाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो.

गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते अशी काही लोकांची श्रद्धा असते. गुरुपुष्य योगावर मंत्रसाधना केली तर ती सिद्ध होते, फलदायी होते अशीही भाविकांची श्रद्धा असते. तसेच या योगावर नदीस्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते अशीही भाविकांची श्रद्धा आहे. निदान गुरुपुष्य योगावर नीती-प्रामाणिक, उद्योगी, निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून कृतीत आणून आपण आपल्या आयुष्याचे सोने बनवू शकतो.

हेही वाचा: इनर इंजिनिअरिंग : मुलांना शिस्त लावण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

पुष्य म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा! ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला 'तिष्य' म्हणजेच मंगलदायी, मांगलिक असे म्हटले आहे. गुरू ही या नक्षत्राची देवता आहे. गुरूचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात. म्हणून गुरुपुष्ययोग हा अमृतसिद्धी योग मानला जातो. लोकांची तशी श्रद्धा आहे. गुरुपुष्य योग हा विवाहाला मात्र अशुभ मानतात. कारण श्रीराम-सीतेचा विवाह गुरुपुष्य योगावरच झाला आणि पुढे त्या दोघांना गृहस्थाश्रमात हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. तशा वधूवरांना लागू नयेत म्हणून हा योग टाळून विवाह मुहूर्त देण्याची प्रथा पडली.

पुष्य नक्षत्र हे आपल्या नक्षत्र चक्रातील आठवे नक्षत्र आहे. पौष महिन्यात हे नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवून रात्रभर आकाशात दर्शन देऊन पहाटे पश्चिमेस मावळते. पौष पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रापाशी असतो. पुष्य नक्षत्र हा एक तारकांचा गुच्छ आहे. तो आयनिकवृत्ताच्या उत्तरेस वृत्ताला लागूनच आहे. पुष्य नक्षत्रावर दुर्बीण रोखली तर तेथे हजारो तारका दिसतात. हे नक्षत्र कर्क राशीत येते. फलज्योतिषात याला ‘कौस्तुभ‘ म्हणतात. पुष्य नक्षत्र शुभ, लघू, ऊर्ध्वमुख, अंध व पुंनक्षत्र मानले जाते.

हेही वाचा: Vastu Tips : घरातील 'या' दिशेला घड्याळ लावणं ठरू शकतं वाईट?

गुरुपुष्य योगामुळे तरी लोकांनी श्रद्धेने या दिवशी सोने, मौल्यवान गोष्टी खरेदी करून बचत करावी हा त्यामागचा एक उद्देश असू शकेल. यापूर्वी २८ आक्टोबर २०२१ रोजी गुरुपुष्य योग आला होता. आजचा गुरुपुष्यामृत योग हा या वर्षातील अखेरचा गुरुपुष्य योग आहे. यानंतर पुढच्यावर्षी (१) ३० जून २०२२ (२) २८ जुलै २०२२ आणि (३) २५ ॲागस्ट २०२२ रोजी असे तीन वेळा गुरुपुष्य योग येणार आहेत. सन २०२३ मध्ये मात्र चार वेळा गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात येणार असल्याने चार गुरुपुष्य योग येणार आहेत. (१) ३० मार्च २०२३ (२) २७ एप्रिल २०२३ (३) २५ मे २०२३ आणि (४) २८ डिसेंबर २०२३ या दिवशी गुरुपुष्य योग येत आहेत.

सन २०२४ मध्ये (१) २५ जानेवारी २०२४ (२) २२ फेब्रुवारी २०२४ (३) २६ सप्टेंबर २०२४ (४) २४ आक्टोबर २०२४ (५) २१ नोव्हेंबर २०२४ असे पाच गुरुपुष्य योग येणार आहेत. सन २०२५ मध्ये (१) २४ जुलै २०२५ , (२) २१ ॲागस्ट २०२५ (३) १८ सप्टेंबर २०२५ असे तीन गुरुपुष्ययोग येणार आहेत.

तेव्हा मित्रानो सोने खरेदी करता आले तर सुवर्ण खरेदी करून किंवा निदान नीतीने, उद्योगी, निर्व्यसनी राहून जीवन जगण्याचा निश्चय करून आपण आपल्या जीवनाचे सोने बनवूया!

(लेखक - दा.कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक)

loading image
go to top