अकोला-खंडवा रेल्वे गेज परिवर्तनाला हिरवी झेंडी

Akola-Khandwa Railway Gauge Transformational Green Zipper
Akola-Khandwa Railway Gauge Transformational Green Zipper

अकोला : दिल्ली येथे सोमवारी (ता.१८) झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे गेज परिवर्तनाला हिरवी झेंडी मिळाली आहे. बैठकीत या प्रकल्पाला ‘वन सवंर्धन कायद्याची’ मंजुरी मिळाल्याने देशभरातील नऊ राज्य जोडली जाणार आहेत. 
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत आज (ता.१८) परिवहन भवन विशेष बैठक घेण्यात आली.

बैठकीत रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय वने व पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत ‘अकोला-खंडवा’ रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचा प्रश्न निकाली लागला. विशेष म्हणजे या मार्गाला ‘वन सवंर्धन कायद्यानुसार’ परवानगी मिळाल्याने लवकरच या मार्गाच्या गेज परिवर्तनाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

अकोट ते आमला खुर्द ब्रॉडगेजच्या कामाला लवकरच प्रारंभ

वन सवंर्धन कायदा १९८० अस्तित्वात येण्यापूर्वीच ‘अकोला- खंडवा’ हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्याने या कायद्यातून रेल्वे मार्गाला वगळण्यात आले आहे. तसेच गेज परिवर्तनाला मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती खासदार संजय धोत्रे यांनी दिली. त्यामुळे ‘अकोट ते आमला खुर्द’ मार्गाच्या गेज परिवर्तनाला मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अकोला अकोट मार्गावर काम सुरू

अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम सुरू असून, त्याचा एक टप्पा म्हणजेच अकोला-अकोट मार्ग गेज परिवर्तन आहे. मात्र, पुढे अकोट ते खंडवा मार्गावरील ‘अकोट ते आमला खुर्द’ हा भाग अमरावती व अकोला जिल्हयातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज रुपांतरणासाठी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक होती. परंतु, या मार्गाला मंजुरी मिळाल्याने गेज परिवर्तनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

२००८ च्या अर्थसंकल्पात मिळाली होती मंजुरी

‘अकोला-खंडवा-रतलाम’ या ४७२ किमी रेल्वे मार्गाच्या मीटर गेज मार्गाच्या गेज परिवर्तनाला वर्ष २००८ च्या रेल्वे अर्थ संकल्पात मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार रतलाम ते खंडवा रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने या मार्गाच्या गेज रुपांतरणाच्या कार्यास मंजुरी दिली असून, यासाठी जवळपास १४२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. 

हे राज्य जोडली जाणार
अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन झाल्यावर हा रेल्वे मार्ग दक्षिण व उत्तर भारतातील नऊ राज्यांना जोडणार आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com