'लिपस्टिक अंडर माय बुरखा'वरील बंदी योग्यच: सेन्सॉर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

सेन्सॉर बोर्डाकडे कोणताही चित्रपट आला की तो समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पाहण्यात येतो. बोर्डाची संपूर्ण टीम एकत्रितपणे चित्रपट पाहते आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात येतो.

मुंबई - निर्माते प्रकाश झा यांच्या "लिपस्टिक अंडर माय बुरखा' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉरने परवानगी नाकारण्याच्या निर्णयाचे सेन्सॉरच्या सदस्या ममता काळे यांनी समर्थन केले आहे. हा चित्रपट कुटुंबियांसह कोणीही पाहू शकत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

निर्माते प्रकाश झा यांचा आणि अलंक्रिता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेला "लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा हिंदी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, चित्रपटात काही अश्‍लिल संवाद आणि दृश्‍ये असून तो समाजातील काही विशिष्ट घटकांसाठी संवेदनशील असल्याचे म्हणत बोर्डाने चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना ममता काळे म्हणाल्या, "चित्रपटातील असभ्य भाषा अस्वीकारार्ह्य आहे. त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरायला नको होती. सेन्सॉर बोर्डाकडे कोणताही चित्रपट आला की तो समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पाहण्यात येतो. बोर्डाची संपूर्ण टीम एकत्रितपणे चित्रपट पाहते आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात येतो. एक महिला म्हणून तुम्ही लैंगिक अधिकारांबद्दल बोलू शकता. मात्र, तसे करताना तुम्ही ते कशा पद्धतीने दाखवत आहेत हे लक्षात घ्यायला हवे. अशा प्रकारचा चित्रपट कोणीही कुटुंबियांसोबत पाहण्यासाठी जाऊ शकणार नाही.'

"समाजातील काही विशिष्ट घटक हा चित्रपटातील काही भाग स्वीकारणार नाही. चित्रपट निर्मात्यांनी असा भाग चित्रपटात दाखवू नये.', असेही काळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान सेन्सॉरचे अन्य एक सदस्य अशोक पंडित यांनी चित्रपटाला परवानगी नाकारल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मंडळाचे अध्यक्ष पंकज निहलानी यांच्यामुळे चित्रपट उद्योग धोक्‍यात आल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Web Title: Censor board defends action : Mamta Kale