धार्मिक भावना दुखावल्याने राखी सावंतला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

हिंदू धर्माचे महाकाव्य आणि रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या तक्रार प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला अखेर आज (मंगळवार) अटक करण्यात आली आहे.

मुंबई : हिंदू धर्माचे महाकाव्य आणि रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अभिनेत्री राखी सावंतला आज (मंगळवार) अटक करण्यात आली आहे.

मागील वर्षी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात राखीने आक्षेपार्ह विधान केले होते. वाल्मिकी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. नऊ मार्च रोजी तिच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले होते. वारंवार समन्स बजावूनदेखील राखी 9 मार्च रोजी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान लुधियाना न्यायालयाने राखी सावंतविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्याने पंजाब पोलिसांनी आज तिला ताब्यात घेतल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

"बिग बॉस' आणि "राखी का स्वयंवर' या कार्यक्रमांमुळे राखी चर्चेत आली होती. तिने मुंबईतील 2014 साली अपक्ष म्हणून निवडणूकही लढविली होती.

Web Title: Rakhi Sawant Arrested For Objectionable Comment On Sage Valmiki