यूपीच्या माजी मंत्र्याच्या ऑफिसमध्ये सापडल्या 11 लाखांच्या जुन्या नोटा

सकाळ ऑनलाइन टीम
Thursday, 31 December 2020

ईडीने अशाच पद्धतीने अमेठी येथील त्यांच्या घरावरही छापा टाकला. त्यांच्या ड्रॉयव्हरच्या घरीही तपासणी केली. ड्रॉयव्हरच्या नावाने कोट्यवधींची संपत्ती खरेदी करण्यात आल्याचे दिसून आले. 

लखनऊ- अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापतींच्या लखनऊ, अमेठी आणि कानपूर येथील आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या सात मालमत्तांवर छापे टाकले. ईडीने कानपूरमध्ये प्रजापती यांच्या चार्टर्ड अकाऊंट (सीए) कार्यालयावर छापा टाकून तपासणी केली. या छाप्यात ईडीने 80 मालमत्तांचे दस्तावेज जप्त केले आहेत. त्याचबरोबर प्रजापती यांच्या लखनऊ येथील ऑफिसमधून 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. 

ईडीने लखनऊमधील बिजनौर रस्त्यावरील गायत्री प्रजापती यांच्या मुलाच्या कंपनीचे ऑफिस, हॅवलॉक रोडवरील गायत्री निवास, अमेठी येथील गायत्री आणि त्यांच्या एका निकटवर्तीयाच्या निवासस्थानी छापे मारले. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी तपासणी सुरु होती. गायत्री प्रजापती यांच्या ऑफिसमधून 1.5 लाख रुपये जप्त करण्यात आले. तर 11 लाख रुपयांच्या बंदी असलेल्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्या. गायत्री प्रजापती यांचा मुलगा अनिलने काळा पैसै पांढरा करण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. ईडीने अशाच पद्धतीने अमेठी येथील त्यांच्या घरावरही छापा टाकला. त्यांच्या ड्रॉयव्हरच्या घरीही तपासणी केली. ड्रॉयव्हरच्या नावाने कोट्यवधींची संपत्ती खरेदी करण्यात आल्याचे दिसून आले. 

हेही वाचा- खलिस्तानी दहशतवाद्याला दुबईहून आणून दिल्ली विमानतळावर केलं अटक

गायत्री प्रजापती यांनी आपल्या अनेक निकटवर्तीयांच्या नावाने संपत्ती खरेदी केल्याचे ईडीच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या नावाने कोट्यवधींची संपत्ती खरेदी केली आहे. ते सर्वजण अत्यंत साधारण कुटुंबातील आहेत. 

दरम्यान, गायत्री प्रजापती हे बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कारागृहात आहेत. मार्च 2017 पासून ते कारागृहात कैद आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. परंतु, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळला होता. त्याचबरोबर त्यांच्यावर खाण घोटाळ्यासह अनेक गुन्हे नोंद आहेत. खाण घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहेत. सीबीआय त्यांची कसून चौकशी करत आहे. सीबीआयच्या खटल्याच्या आधारावर ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ लाँड्रिग एक्टनुसार (पीएमएलए) त्यांच्या विरोधात खटला दाखल केला होता. 

हेही वाचा- पाकिस्तानात उद्ध्वस्त केलं ऐतिहासिक हिंदू मंदिर; जीर्णोद्धाराची मागितली होती परवानगी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 lakh old prevented notes found in former UP minister gayatri prajapati office