उत्तर प्रदेशात विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मे 2019

एकाच कुटुंबातील पिता व तीन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे घरात कर्ते पुरुषच राहिले नाही. एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबातील महिलांवर आली आहे.

बाराबंकी (उत्तर प्रदेश): बाराबांकी जिल्ह्यातील रामनगर गावामध्ये विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण अस्वस्थ आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर गावामध्ये विषारी दारू प्यायल्यामुले 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. गावातील सरकारमान्य दुकान असलेल्या दुकानामधून त्यांनी दारू खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. दारू प्यायल्यानंतर अनेकांची दृष्टी गेली. तसेच इतरही त्रास सुरू झाले. मात्र उपचारादरम्यान विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांसह अनेकजण गावामध्ये दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

एकाच कुटुंबातील पिता व तीन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे घरात कर्ते पुरुषच राहिले नाही. एकाचवेळी चौघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबातील महिलांवर आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात 21 फेब्रुवारी रोजी विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने यापूर्वी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 die in UP after drinking spurious liquor