मुस्लिमांना तेलंगणात 12% आरक्षण; भाजपचे 5 आमदार निलंबित

आर. एच. विद्या
सोमवार, 17 एप्रिल 2017

भाजपशिवाय सर्व पक्षांचा पाठिंबा

या विधेयकाला भाजपशिवाय सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पाचही सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले होते. विधेयक मंजुरीदरम्यान केंद्र सरकारने अडथळा आणल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही मुख्यमंत्री राव यांनी दिला आहे.

हैदराबाद : मागासवर्गीय मुस्लिमांचे आरक्षण वाढवून हा कोटा 12 टक्के करण्याचा प्रस्ताव असलेले विधेयक तेलंगणच्या विधानसभेत रविवारी एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पाचही सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. 

विधानसभेच्या विशेष सत्राच्या सुरवातीलाच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हे विधेयक मांडत आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिमांसाठीच्या आरक्षण कोट्यात वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला. या विधेयकानुसार अनुसूचित जमातींच्या आरक्षण कोट्यातही वाढ करून तो 10 टक्के करण्यात आला आहे.

या विधेयकाला भाजपशिवाय सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पाचही सदस्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले होते. यानंतर या विधेयकाला सर्वांचा पाठिंबा मिळून ते मंजूर करण्यात आले. या विधेयकावर आता विधान परिषदेत चर्चा होणार आहे. अनुसूचित जमातींना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण सहा ते दहा टक्के करण्यात आले आहे.

अडथळा आणल्यास...
विधान परिषदेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले जाणार आहे. विधेयक मंजुरीदरम्यान केंद्र सरकारने अडथळा आणल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही मुख्यमंत्री राव यांनी दिला आहे. हे आरक्षण आर्थिक निकषांवरच दिले गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Web Title: 12 percent muslim quota in telangana