एएन-32 विमान दुर्घटनेतील 13 मृतदेह सापडले

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

12,000 फूट उंचावरील घनदाट जंगलात हे विमान कोसळले होते. येथील काही मैल परिसर हा निर्मनुष्य वस्ती असलेला भाग आहे.

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील मेचुकाजवळ 3 जूनला भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) एएन-32 या वाहतूक विमानाची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील 13 जणांचे मृतदेह शोधण्यात शोधपथकाला यश मिळाले आहे. दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह अंतिम संस्कारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. 

खराब हवामानामुळे 14 जूनला हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेली शोधमोहीम तात्पुरती थांबवण्यात आली होती. 12,000 फूट उंचावरील घनदाट जंगलात हे विमान कोसळले होते. येथील काही मैल परिसर हा निर्मनुष्य वस्ती असलेला भाग आहे.  

18 जूनला काही कुली आणि शिकारी यांच्यासोबत वायुसेनेचे एक पथक हेलिकॉप्टरद्वारे या जंगलात पाठविण्यात आले होते. या पथकात गिर्यारोहक, वायुसेनेतील काही लष्करी कर्मचारी आणि स्थानिक लोकांचा समावेश करण्यात आला होता. 

3 जूनला एएन-32 हे वाहतूक विमान बेपत्ता झाले होते. 11 जूनला एमआय-17 हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर 18 जूनला शोधपथक घटनास्थळी दाखल झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 bodies were found of AN32 crashed aircraft in Arunachal Pradesh