सरकारी संकेतस्थळांवर 13 कोटी आधार क्रमांक खुले!

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

केंद्र सरकारच्या दोन आणि आंध्र प्रदेश सरकारच्या दोन संकेतस्थळांवर विविध योजनांमधील लाभार्थ्यांची माहिती, त्यांचे आधार क्रमांक आणि बँके खात्याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या दोन आणि आंध्र प्रदेश सरकारच्या दोन संकेतस्थळांवर विविध योजनांमधील लाभार्थ्यांची माहिती, त्यांचे आधार क्रमांक आणि बँके खात्याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'द सेंटर फॉर इंटरनेट ऍण्ड सोसायटी'ने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. या अभ्यासाचा 27 पानांचा अहवाल द सेंटर फॉर इंटरनेट ऍण्ड सोसायटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाच्या दोन योजनांच्या लाभार्थ्यांची संपूर्ण माहितीसह यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर आंध्र प्रदेशमधीलही दोन योजनांच्या लाभार्थ्यांची माहितीही खुली करण्यात आली आहे. त्यामध्ये लाभार्थ्याचे नाव, वय, पत्ता, जात, धर्म, छायाचित्र, आधार क्रमांक, बँकेची माहिती देण्यात आली आहे. या चारही संकेतस्थळांवर मिळून एकूण 13 कोटी नागरिकांची माहिती उघड झाली आहे. अशा प्रकारे माहिती प्रसिद्ध करणे बेकायदा असल्याचे अहवालात म्हटले आहे. उघड करण्यात आलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार केला जाऊ शकतो, अशी शक्‍यताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती उघड करण्यात आली आहे. तर आंध्र प्रदेशमधील नरेगातील लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या दैनंदिन मोबदल्याचा अहवाल आणि चंद्रम्मा विमा योजनेतील लाभार्थ्यांची माहिती उघड करण्यात आली आहे.

Web Title: 13 crore aadhar numbers acccessible on govt portals