Coronavirus : 15 नवे कोरोना रुग्ण आढळले; राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा स्थगित!

Corona-Patient
Corona-Patient

Coronavirus : तिरुअनंतपुरम (केरळ) : केरळमध्ये रविवारी (ता.२२) १५ नवीन रुग्ण आढळले असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७ वर पोचला असल्याची माहिती केरळचे मुख्य सचिव टॉम जोस यांनी दिली. 

रविवारी नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये एर्नाकुलममधील दोन जण, मलप्पुरम येथील दोन जण, कोझिकोड येथील दोन, कन्नूर येथील चार आणि कासारगुडू येथील पाच जणांचा समावेश असून, यामुळे केरळमधील बाधितांची आकडा ६७ झाला आहे, तर ५९ हजार २९५ जण वैद्यकीय निरीक्षणाखाली असून यातील ५८ हजार ९८१ जणांना त्यांच्या घरी एकांतवासात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तसेच राज्य परिवहन उपयुक्तता केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), कोची मेट्रो, ऑटो आणि टॅक्सी या सर्व सेवा ३१ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध घातल्यानंतरही काही समाजकंटकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर केरळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

कोरोनाचे बनावट औषध विकणाऱ्यास अटक

कोरोनावर रामबाण औषध असल्याचे सांगत एकजण त्या बनावट औषधाची विक्री करताना आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एका विशिष्ट जातीचा लसूण, बिर्याणी मसाला आणि आले यापासून तयार केलेले कोरोनाचे बनावट औषध विकून तो नागरिकांना गंडा घालत होता. हमसा असे या व्यक्तीचे नाव असून तो कासारगोड येथील रहिवासी आहे. एका व्यक्तीला कोरोनाचे बनावट औषध विकताना विद्यानगर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विपिन यांनी त्याला रंगेहात पकडले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूला रविवारी केरळमधील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनीदेखील याला आपला पाठिंबा दर्शवत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते. जनता कर्फ्यूचे पालन करताना राज्याचे मुख्यमंत्री विजयन आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांनी आपापल्या निवासस्थानी दिवस घालवत याचे पालन केले. तर, जनता कर्फ्यूच्या काळात राज्यातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्था सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

देशभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com