'बीएसएफ'च्या गोळीबारात पाकचे 15 सैनिक ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली: काश्‍मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेनजीक सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आज (शुक्रवार) प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे किमान 15 सैनिक ठार झाले. पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करत भारतीय चौक्‍यांवर गोळीबार सुरू केला होता आणि त्याच्या आडून दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसविण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला 'बीएसएफ'ने चोख प्रत्युत्तर दिले.

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे घुसखोरीचे दोन प्रयत्न उधळून लावले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने आज (शुक्रवार) सकाळपासूनच जोरदार गोळीबार करण्यास सुरवात केली होती. भारतीय लष्कराच्या चौक्‍यांसह पाकिस्तानने सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले. काल (गुरुवार) झालेल्या चकमकीमध्ये 'बीएसएफ'च्या गोळीबारात पाकिस्तानचा एक सैनिक ठार झाला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा एक जवान हुतात्मा झाला आणि 13 नागरिक जखमी झाले.

सप्टेंबरमध्ये भारताने पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या तळावर कारवाई केली होती. या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलांच्या चार कर्मचाऱ्यांसह पाच भारतीयांचा मृत्यु झाला आहे, तर 34 जण जखमी झाले आहेत. 21 ऑक्‍टोबर रोजी 'बीएसएफ'ने पाकिस्तानच्या सात सैनिकांसह एका दहशतवाद्याला ठार केले होते.

आम्ही नागरिकांवर कधीही गोळीबार करणार नाही. पण पाकिस्तानने प्रथम आमच्यावर गोळीबार केला, तर त्याला तितकेच चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
- अरुण कुमार, सीमा सुरक्षा दलाचे सहायक महासंचालक

Web Title: 15 Pakistani soldiers killed in retaliatory firing by BSF in Kashmir